खेले दांडिया.. गरबाची धूम! Print

नागपूर / प्रतिनिधी
नवरात्रोत्सव निमित्त शहरातील विविध भागात गरबा-दांडिया उत्सवाची धूम सुरू झाली आहे. पूर्वी गरबा-दांडियासाठी डीजेचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात होती. परंतु, गेल्या चार-पाच वर्षांत स्थानिक आणि बाहेरगावच्या वाद्यवृदांना आमंत्रित करण्यात येत असल्याने अनेक कलाकारांसाठी गरबा उत्सव आता हंगामी कमाईचे साधन झाला आहे.
पूर्वी दांडियांमध्ये मोठमोठय़ा गायकांचे आणि आणि वाद्यवृदांचे कार्यक्रम आयोजित करणे सर्वानाच शक्य होत नव्हते ते उपलब्ध होत नसे त्यामुळे डीजेचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात होता. गरबा खेळणारे दांडिया स्पेशल कॅसेटस् आणि सीडीज्मधील गाण्यांवर नाचण्याचा आनंद लुटत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून गरबाचा बाज बदलला असून वाद्यवंृदांना महत्त्व आले आहे. शहरातील आगरकर आणि संच, एम.ए. कादर, ओ पी सिंग, हफीज अ‍ॅन्ड हीज आर्केस्ट्रा, सन बीट, अनिल केवलरामानी, यश आर्केस्ट्रा आदी नामांकित वाद्यवंृद गरबा महोत्सवात सहभागी झाले आहे. विशेषत: गरबा व दांडियामध्ये वाजविला जाणारा वाद्यंवृद हा वेगळाच प्रकार आहे त्यासाठी गुजराथी गाणी गाणाऱ्या गायक-कलावंताना बाहेरून आमंत्रित केले जाते. यावर्षी शहरातील विविध भागात तर दंडियासाठी खास गुजरात आणि मुंबईतील गुजराथी गायक कलावंताना आणि वाद्यवृदांना आमंत्रित करण्यात आले आहे. वर्धा मार्गावरील खापरीजवळील मैदानात सुरू असलेल्या संकल्प संस्थेच्या दांडिया उत्सवात गुजरातमधील वादक कलाकार आले आहेत. शिवाय जवाहर वसतिगृह, क्वेट्टा कॉलनी, चिटणीस पार्क, वर्धमाननगर, पाचपावली या भागात मुंबई आणि गुजरातमधील कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. एका वाद्यवृदांमध्ये १५ ते २० वादक -गायक कलाकार आहेत. लोटस कल्चरल क्लबचे प्रमुख दयाशंकर तिवारी म्हणाले, डीजेवर वेगवेगळी गीते वाजविण्यापेक्षा वाद्यवृंदाच्या तालाने एक वेगळाच माहोल तयार होतो. नागपुरात गुजराथी गाणी म्हणणारे कलावंत फारच कमी असल्यामुळे बाहेरून कलावंतांना आमंत्रित करण्यात येते. चिटणीस पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गरबा-दांडिया उत्सवात गेल्यावर्षी मुंबईच्या महिलांचा वाद्यवृंदाला आमंत्रित केल्याचे तिवारी यांनी सांगितले. ज्येष्ठ गायक व कादर ऑर्केस्ट्राचे संचालक एम. ए. कादर म्हणाले, गरबा उत्सव आयोजित करणाऱ्या संस्थाची संख्या वाढल्यामुळे तितके वाद्यवृंद शहरात नाहीत. आज गल्लीबोळात गरबा आणि दांडिया उत्सव साजरा केला जातो. यामुळे अनेक स्थानिक कलावंत नऊ दिवस व्यस्त असतात. बाहेरील कलावंताना मोठय़ा प्रमाणात मानधन दिले जाते मात्र स्थानिक कलावंताना त्याच्या तुलनेत मानधन मिळत नसल्याची खंत कादर यांनी व्यक्त केली. दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी विविध कंपन्यांनी ‘दांडिया स्पेशल’ आणि डीजे मिक्सच्या कॅसेटस् आणि सीडीज् बाजारात आणल्या आहेत. जास्तीत जास्त शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत मिळणाऱ्या या कॅसेटस् आणि सीडीज्ना चांगली मागणी आहे. यामध्ये पारंपरिक गाण्यांपासून ते रिमिक्सपर्यंत सर्वच गाणी असली तरी फाल्गुनी पाठक, डीजे अकिल, डीजे सुकेतू यांच्या दांडिया मिक्सला विशेष पसंती आहे.