झोपडपट्टीतील गैरप्रकारांचा मुद्दा नागपुरात पुन्हा ऐरणीवर Print

नागपूर / प्रतिनिधी
झोपडपट्टय़ात सर्रास गैरप्रकार घडत असताना वर्षांनुवर्षे निवडून येणारे लोकप्रतिनिधी करतात काय? असा सवाल करून स्त्री अत्याचार विरोधी परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सीमा साखरे यांनी खारदार विलास मुत्तेमवार, भाजपाध्य नितीन गडकरी, पालकमंत्री शिवाजीराव मोघे आणि महापौर अनिल सोले यांच्यावर चांगलीच आगपाखड केली.
नागपुरातील नाईकनगर झोपडपट्टीत इक्बाल या गुंडाची झोपडपट्टीतील नागरिकांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याने नागपूर शहरातील झोपडपट्टीदादांचा मुद्दा आता ऐरणीवर आला असून पहिल्यांदाच एखाद्या समाजसेविकेने झोपडय़ांना भेटी देऊन तेथील लोकांशी चर्चा केली. या भेटीनंतर सीमा साखरे म्हणाल्या प्रत्येक वॉर्डात झोपडपट्टी अस्तित्वात आहे. त्याठिकाणी पोलिसांच्या संगनमताने सट्टे, जुगाराचे अड्डे, दारूविक्री, महिलांवर अत्याचार होतात. मात्र पोलीस या प्रकरणात काहीच करीत नाही. कायद्यावर प्रचंड विश्वास आहे मात्र, सर्व बाजूने पिचलेला माणूस या व्यवस्थेवर अविश्वास दाखवून कायदा हातात घेतो तेव्हा लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि न्याय व्यवस्थेनेदेखील ते गांभीर्याने घ्यायला हवे. वर्षांनुवर्षे खासदार विलास मुत्तेमवार निवडून येतात. मात्र लोकांपर्यंत जावून त्यांचे प्रश्न जाणून घेण्यास त्यांना फुरसत मिळत नाही. भारतीय जनता पार्टीचे नितीन गडकरी एका जबाबदार पक्षाचे अध्यक्ष आहेत मात्र, त्यांना झोपडपट्टीत राहणाऱ्या सामान्य माणसाशी काही देणेघेणेच नाही. पालकमंत्री केवळ नावाला असून शिवाजीराव मोघेंना कधी झोपडपट्टीतील नागरिकांशी हितगूज करायला वेळ मिळत नाही, अशा शब्दात सीमाताईंनी नेते मंडळींचा समाचार घेतला.
वसंतनगरातील घटनेला उचलून धरल्याबद्दल त्यांनी प्रसिद्धी माध्यमांचे अभिनंदन केले. झोपडपट्टय़ांचे परिशीलन व्हायला हवे आणि त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. झोपडपट्टय़ांत पोलिसांच्या मदतीनेच गुंडांना अभय मिळते. वसंतनगरात जिव मुठीत घेऊन महिला जगत होत्या. जेव्हा गुंडाचा अक्कु यादव नागरिकांनी केला. तेव्हा थातुरमातुर निलंबनाची कारवाई करून पोलीस आयुक्त अंकुश धनविजय मोकळे होतात. लोकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असताना आता कुठे त्यांना जाग आली असून जनता दरबार भरवण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. मुळात पोलिसांचे निलंबन हा केवळ फार्स असून त्यांना अर्धा पगार देऊन काही दिवसांनी गुपचूप मागच्या दाराने पोलिसांना परत बोलावले जाते आणि सामान्य जनतेला ते कळत देखील नाही.