कुख्यात डॉन नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात Print

अरुण गवळीचे आगमन आणि गमन..
नागपूर / प्रतिनिधी
शिवसेनेचे नगरसेवक जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला आरोपी कुख्यात डॉन अरुण गवळीला सुरक्षेच्या कारणावरून गुरुवारी सायंकाळी ठाण्याच्या तळोधा कारागृहातून नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. मात्र, एक दिवस मुक्कामास ठेवल्यानंतर एका खटल्याच्या सुनावणीला हजर राहण्यासाठी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात त्याला शुक्रवारी दुपारी पुन्हा मुंबईत नेण्यात आले. त्याला आता सोमवारी नागपूरला आणण्यात येणार असल्याची माहिती कारागृहाच्या सूत्रांनी दिली.
नगरसेवक जामसंडेकर यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली डॉन अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून त्याला व त्याच्या साथीदारांना ठाण्याच्या तळोधा कारागृहात ठेवण्यात आले होते. या कारागृहात गवळीच्या टोळीमधील अनेक गुन्हेगार असल्यामुळे ही टोळी पुन्हा एकत्र येऊ नये, यासाठी त्याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हलविण्याचा  निर्णय सरकारने घेतला होता.
 अरुण गवळी नागपूरच्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणार असल्याचे पत्र नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकाऱ्यांना मिळाले होते. गुरुवारी सायंकाळी नागपुरातील मध्यवर्ती कारागृहाच्या अतिसुरक्षा कक्षात त्याला स्वतंत्र बराकीत ठेवण्यात येणार असून इतर कैद्यांशी संपर्क साधण्याची संधी मिळू नये, अशा सूचनाही कारागृह मुख्यालयाने अधिकाऱ्यांना दिल्या. सशस्त्र पोलिसांच्या गराडय़ात मोठय़ा व्हॅनमधून डॉन गवळी गुरुवारी नागपुरात पोहोचला. तो येणार असल्याचे कळाल्याने त्याचे २०-२५ साथीदार कारागृह परिसरात जमा झाले होते. ‘डॉन’ने त्याच्या साथीदारांसोबत चर्चा केली. त्याला आणल्याची खबर कानोकानी झाल्यानंतर गवळीला पाहण्यासाठी अनेकांनी उत्सुकतेपोटी कारागृहासमोर गर्दी केली होती.