विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अंबाझरी पोलिसांची बेदम मारहाण Print

क्षुल्लक वादातून प्रकरण
प्रतिनिधी/ नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यपीठाच्या गुरुनानक भवनाजवळच्या पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अंबाझरी पोलिसांनी लाठय़ाकाठय़ांनी अमानुष मारहाण केली. पोलिसांच्य धमकीचे वसतिगृहातील अनेक विद्यार्थी बिथरले असून जखमी विद्यार्थी काहीही बोलायला तयार नाहीत.
घटनेचा वृत्तांत असा की किशोर नानाजी महाजन हा विद्यार्थी रात्री ८.३० वाजता फुटाळ्याजवळच्या सिद्धिविनायक मेसमध्ये जेवणासाठी गेला होता. चुकून त्याच्या ताटात शेजारच्या विद्यार्थ्यांच्या हातून पाणी पडले. त्यामुळे मेस मालक प्रदीप नायडू याचा मुलगा रोहन याला त्याने ताट बदलून देण्याची विनंती केली. रोहनने रागारागाने त्याच्या समोर दुसरे ताट आपटले. ते देताना अर्वाच्य भाषा वापरली. तेव्हा किशोरने त्याला प्रत्युत्तर दिले. यातून वाद वाढत गेला.  तेव्हा बाजूलाच असलेल्या रोहनच्या वडिलांनी किशोरला मारण्यास सुरुवात केली. यात किशोरच्या मानेला आणि हाताला जबर मार बसला. जखमी अवस्थेत किशोरने अंबाझरी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तोपर्यंत मेसमध्ये इतर जेवणारे विद्यार्थी वसतिगृहात पोहोचले आणि त्यांनी घडलेला वृत्तांत इतर विद्यार्थ्यांना सांगितला. विद्यार्थी अंबाझरी पोलीस ठाण्यात गेले. नायडूवरही कारवाई होईल, अशी हमी भरल्यानंतर विद्यार्थी वसतिगृहाकडे वळले.
मेस मालकावर पोलीस काय कारवाई करतात हे पाहण्यासाठी विद्यार्थी मेससमोर थांबले. त्यांनी जोरजोरात बोलायला सुरुवात केली. त्यावेळी बाजूच्या अ‍ॅड. सिद्धार्थसिंग चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात फोन करून चौकात दगडफेक होत असल्याचे सांगितले. पेट्रोलिंगवर असलेले पोलीस लवकरच चौकात आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार करायला सुरुवात केली. त्यात एका विद्यार्थ्यांचा हात फॅक्चर झाला. जखमी विद्यार्थ्यांमध्ये विवेक झिंगरे, राहुल भेंडे, प्रमोद मशाखेत्री आणि झपाटे यांचा समावेश आहे. विवेक आणि राहुल यांना दोन तास पोलिसांनी डांबून ठेवले, असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात प्रदीप नायडू यांनी दिलेली उत्तरे विसंगत  आहेत.  एकीकडे नायडू म्हणतात की किशोर दोन-तीन दिवसांपासून आम्हाला त्रास देत होता आणि दुसऱ्या बाजूला झाल्या प्रकाराबद्दल किशोरची त्यांनी माफीही मागितली आहे. वसतिगृहाचे वार्डन डॉ. उंदिरवाडे यांनी संबंधित प्रकरण अजिबात गंभीर वाटले नाही त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले.     

घटनेचे प्रत्यक्षदर्शी अ‍ॅड. सिद्धार्थ सिंग चव्हाण म्हणाले, गुरुवारी मध्यरात्रीला विद्यार्थ्यांचा जमाव पाहून अंबाझरी पोलीस ठाण्यात तातडीने फोन केला. तेव्हा पोलिसांच्या दोन गाडय़ा भरून आल्या आणि त्यांनी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली. असंख्य विद्यार्थी त्याठिकाणी असताना विद्यार्थ्यांनी हात उगारला असता तर पुन्हा त्यांना दोषी ठरवण्यात आले असते. विद्यार्थी जोरजोरात बोलत होते. मोठी संख्या असल्याने रात्रीच्या शांततेत आवाज मोठा वाटला असेल मात्र, विद्यार्थ्यांनी कुठलीच दगडफेक केली नाही. रात्री दीड वाजता पोलीस ठाण्यातही गेलो होतो. दरम्यान सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यापीठ प्रशासनाला एवढय़ा गंभीर घटनेची माहिती संबंधित वार्डनने पोहोचवली नव्हती. त्यानंतर कुलसचिव डॉ. अशोक गोमासे आणि वार्डन डॉ. उंदीरवाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.