गॅस सिलिंडरला ‘बायोगॅस’चा सशक्त पर्याय Print

दिलीप शेळके
नागपूर, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
alt

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरवाढीने सारे होरपळून निघत असताना यावर शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बायोगॅस हाच एक सशक्त पर्याय आता उपलब्ध आहे. जंगलतोड थांबावी, वन संरक्षण व्हावे आणि ग्रामीण भागातील इंधनाची समस्या सुटावी या हेतूने बायो अथवा गोबर गॅस प्रकल्प उभारणीसाठी प्रोत्साहन म्हणून सरकारने हा प्रकल्प उभारणाऱ्यांना अनुदानही सुरू केले आहे.
अलिकडच्या काळात यांत्रिक शेती होऊ लागल्याने पशुधन कमी होत आहे. यामुळे पुरेसे शेण न मिळत नसल्याने बायोगॅस चालविण्यात काही अडचणी येत असल्या तरी अजूनही इंधनासाठी हाच एक सशक्त पर्याय म्हणून याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक झाले आहे.  
बायो गॅस उभारणीसाठी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. दोन घनमीटरच्या (दोन बाय दोन मीटर) वरील बायोगॅस प्रकल्पासाठी सरकारकडून ८ हजार रुपये आणि या प्रकल्पाला जोडून शौचालय असेल तर ९ हजार रुपये अनुदान दिले जाते.
नागपूर जिल्ह्य़ात जिल्हा परिषदेच्या योजनेंतर्गत १६ हजार बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यातील १२ हजार प्रकल्प सुस्थितीत कार्यरत आहेत. काही तात्रिक अडचणींमुळे बंद पडले आहेत.
यावर्षी जिल्ह्य़ात तीनशे बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे नागपूर जिल्हा परिषदेचे लक्ष्य आहे. यातील ४६ प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून  पाऊस थांबल्यानंतर उर्वरित प्रकल्पांची कामे सुरू होतील.
शहरांमध्ये हॉटेल आणि मंगलकार्यालयांनी बायो गॅस प्रकल्प उभारणीकडे आवर्जून लक्ष द्यावे, या प्रकल्पांमुळे इंधनाचा प्रश्न तर सुटतोच, त्याचबरोबर पिकांसाठी उपयुक्त असे सेंद्रीय खतही मिळत असल्याने हा रासायनिक खतालासुद्धा हा एक सशक्त पर्याय आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विलास कोलते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय बायोगॅस आणि खत व्यवस्थापन कार्यक्रम केंद्राच्या २० कलमी कार्यक्रमात समाविष्ट आहे. त्यानुसारच हा कार्यक्रम राज्यात राबविण्यात येतो. २००९-१० आर्थिक वर्षांपासून बायोगॅस संयंत्र लाभधारकास अनुदान वाढवून देण्यात आले आहे.
शौचालयास जोडलेल्या बायोगॅस संयंत्रासाठी अतिरिक्त अनुदान देण्यात येत आहे. राज्यात उभारण्यात आलेली बायोगॅस संयंत्रे योग्य प्रकारे वापरली जावीत यासाठी लाभार्थीना प्रशिक्षण देण्यात येते. बायोगॅस संयंत्राची उभारणी प्रशिक्षित गवंडय़ाकडूनच केली जाते.
गुरांच्या शेणासोबतच पालापाचोळा, कृषी उत्पादनातील टाकावू पदार्थ ऊर्जा स्रोत म्हणून बायोगॅस प्रकल्पात वापरण्यात येतात.
रासायनिक खतांच्या किमती यावर्षी अडीच पटीने वाढल्याने रासायनिक खताला सेंद्रीय खताचा पर्याय आहे. हे सेंद्रीय खत बायोगॅस प्रकल्पातून मिळविता येत असल्याने किमान चार गुरे असलेल्या शेतक ऱ्यांना बायोगॅस प्रकल्पांची उभारून इंधन आणि खताची समस्या निश्चितच दूर करता येईल.