मुलीला मारल्यावरून दोन कुटुंबांत हाणामारी Print

नागपूर / प्रतिनिधी
मुलीला मारण्यावरून दोन कुटुंबात मारमारी होऊन त्यात तिघे गंभीर जखमी झाले. पूर्व नागपुरातील अंतुजीनगरात रविवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. टिकाराम गणपत पौनीकर (रा. अंतुजीनगर) यांच्या मुलीला त्याच वस्तीत राहणाऱ्या आरोपी बाबुलाल ईश्वर मेश्राम याने मारल्याने तसेच त्याच्या आईने शिवीगाळ केल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी टिकाराम पत्नीसह बाबुलालच्या घरी गेला. तेथे दोन्ही कुटुंबाचे जोरदार भांडण झाले. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. आरोपी बाबुलाल, त्याचे वडील ईश्वर बापूराव मेश्राम व मुकेश मेश्राम यांनी टिकारामवर धारदार शस्त्राने व लोखंडी पाईपने गळा, कपाळ व डोक्यावर गंभीर दुखापत झाली. त्याला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी बाबुलाल, त्याचे वडील ईश्वर बापुराव मेश्राम व मुकेश मेश्राम यांच्या विरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवून आरोपी बाबुलाल, त्याचे वडील ईश्वर बापुराव मेश्राम या दोघांना अटक केली. आरोपी किसनीबाई पौनीकर हिने शिवीगाळ केली. टिकाराम पौनीकर यानेही शिवीगाळ करीत काठीने मारहाण केल्याने बाबुलाल ईश्वर मेश्राम याच्या डोक्यावर व त्याचे वडील ईश्वर यांच्या डाव्या हातावर गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी बाबुलालच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी किसनीबाई पौनीकर व टिकाराम गणपत पौनीकर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला.