विष्णुदास महाराज साधना केंद्रातर्फे राज्यस्तरीय आध्यात्मिक शिबीर Print

नागपूर / प्रतिनिधी
श्रीगुरुमंदिर नागपूर प्रणित अकोला येथील विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्राच्यावतीने साधकांचे तीन दिवसांचे राज्यस्तरीय आध्यात्मिक शिबीर अकोला येथे २६ ते २८ ऑक्टोबपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
अकोल्याच्या सुधीर कॉलनीजवळील जवाहर नगरातील महाराजा अग्रसेन भवनात होणार असलेल्या या शिबिरात राज्यभरातून सुमारे १ हजार साधक येण्याची अपेक्षा आहे. विष्णुदास महाराजांनी त्यांची जीवनयात्रा अकोल्यात संपवली होती, म्हणून शिबिरासाठी अकोल्याची निवड करण्यात आली आहे. हे निवासी शिबीर नि:शुल्क राहणार आहे. शिबिराच्या निमित्ताने तीन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सद्गुरूदास महाराज त्यात पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात श्रीनाथ भक्तिपीठाचे मठाधीश नरेंद्रनाथ महाराज, विठ्ठल महाराज, दत्तमहाराज कुळकर्णी, दादासाहेब आवदे, गजाननराव कुळकर्णी, विजय पांडे हे मार्गदर्शन करणार आहेत. रांगोळी, गजर, नृत्य, वेषभूषा इ. स्पर्धा, नाटिका, ध्यानवर्ग यांचेही आयोजन शिबिरात करण्यात आले आहे. २७ ऑक्टोबरला शिबीर परिसरातून निघणारा श्रींचा भव्य पालखी सोहळा हे शिबिराचे मुख्य आकर्षण राहणार असून यात पुरुष उपासक सोवळ्यात, तर महिला उपासक नऊवारीत सहभागी होणार आहेत. शिबिराच्या व्यवस्थेसाठी अविनाश देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली संयोजन समिती तयार करण्यात आली आहे. गुरुमंदिर परिवारातील उपासकांनी शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.