विद्यार्थ्यांचा प्रश्न लावून धरण्यात विद्यार्थी संघटना अपयशी! Print

नागपूर / प्रतिनिधी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधनिर्माणशास्त्र व पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अंबाझरी पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी विविध विद्यार्थी संघटनांची भूमिका संशयास्पद आणि श्रेय लाटणारी ठरली. चार विद्यार्थ्यांना गुन्हेगाराप्रमाणे मारहाण करून, त्यांना अर्वाच्य शिव्या देऊन आणि दोन विद्यार्थ्यांना दोन तास पोलीस ठाण्यात डांबणाऱ्या अंबाझरी पोलीस ठाण्याच्या विरोधात विद्यापीठाने ब्र देखील काढला नाही. मेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांला मारहाण केली ती कायदेशीर की बेकायदेशीर याच मुद्दय़ावर खल होत राहिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेने गेल्याच आठवडय़ात विद्यार्थ्यांसाठी मोर्चा काढला. संघटनेच्या नेत्यांनाही त्या मारहाणीबद्दल माहिती देण्यात आली होती. मात्र, ही संघटनाही विद्यार्थ्यांच्या बाजूने उभी राहिली नाही. विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा प्रश्न संघटनेचा कसा होऊ शकतो, असा हास्यास्पद प्रश्न संघटनेच्या नेत्यांनी पुढे केला. एरव्ही तोडफोड करण्यात आघाडीवर असलेल्या आणि नागपुरातील इतर वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या(अभाविप) प्रश्नांवर मौन बाळगून आहेत. विद्यार्थी संग्राम परिषदेच्या यशोधन वाघमारे याने तर नेत्याला शोभतील अशी विधाने केली. ‘घटना दुर्दैवी आहे’, असे म्हणण्यापलीकडे त्यांच्या संघटनेची कृती शुन्य आहे. विशेष म्हणजे घटना गेल्या आठवडय़ातील गुरुवारच्या मध्यरात्रीची घटना घडून १६ तास लोटूनही वसतिगृह अधीक्षक डॉ. उंदीरवाडे यांना मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करायला वेळ मिळाला नाही. मुंबईवरून प्राचार्य डॉ. बबन तायवाडे यांनी कुलसचिव डॉ. अशोक गोमासे यांना फोन केल्यानंतर गोमासे यांच्या सांगण्यावरून उंदीरवाडे यांनी धावतपळत वसतिगृह गाठून त्यांच्या खास शैलीने प्रकरण शांत केले. विद्यापीठाच्या सर्वच वसतिगृहात बेकायदेशीररित्या विद्यार्थी राहतात. काही अगदीच गरीब, होतकरू तर अनेक वर्षांपासून वसतिगृहात राहण्याचा अनुभव असलेले निर्ढावलेले विद्यार्थी प्रत्येक वसतिगृहात आहेत. सिद्धीविनायक वसतिगृहात ज्या विद्यार्थ्यांला मारहाण झाली आणि ज्याने पोलीस तक्रार केली तो विद्यार्थी सेट-नेटची तयारी करणारा आहे. मात्र, त्याला वसतिगृह नाही. म्हणून त्याच्यावर बेकायदेशीर वसतिगृहात राहत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. विद्यापीठ सेट-नेटसाठी प्रवेश देते तर वसतिगृह का देत नाही, असा प्रश्न विद्यार्थ्यांतर्फेच उपस्थित करण्यात आला.