आदिशक्ती दुर्गा मंदिर Print

देवीचा महिमा
नागपूर / प्रतिनिधी
आदीशक्ती देवी

पूर्व नागपुरातील जुन्या नंदनवन परिसरात असलेल्या आदिशक्ती दुर्गा मंदिरात नवरात्र उत्सव सुरू असून दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून येत आहे. विविध जाती-धर्माचे लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवीच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या मंदिराबाबत बोलताना मंडळाचे सचिव विलास सरोदे म्हणाले, १९७५ मध्ये बाबुलाल व्यास,ना.मा. चिंचखेडे व यादवराव ढबाले यांनी त्यावेळी मंदिराची प्रतिष्ठापना केली होती. मंदिराच्या स्थापनेला जवळपास ३६ वर्ष पूर्ण झाले आहे. आज ज्या भागात मंदिर आहे त्या भागात पूर्वी मोकळी जागा होती. परिसरात अनेक लोकांनी घरे बांधल्यानंतर परिसरातील काही ज्येष्ठ नागरिकांनी या भागात मंदिर असावे या उद्देशाने १९७६ मध्ये आदिशक्ती दुर्गामाता पंचकमेटी स्थापना केली आणि देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर छोटे मंदिर बांधण्यात आले. १९९६ मध्ये मंदिराच्या जिर्णोद्धाचे काम सुरू करण्यात आले. १९९७ मध्ये जयपूरहुन आदिशक्ती देवीची मूर्ती आणून त्याच जागी विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी आदिशक्ती नऊ रुपाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. आज जुन्या नंदनवन भागात प्रशस्त मंदिर बांधण्यात आले असून नवरात्र उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. नवरात्र उत्सवात भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. बाबुलाल व्यास यांनी ज्या मदेवीच्या मूर्ती प्रतिष्ठापना केली होती ती मूर्ती मंदिरात आहे.
देवीच्या मंदिरात महिला खणा नारळाची ओटी भरतात. परिसरात राहणारे विविध जाती धर्माचे लोक या उत्सवात सहभागी होत असतात. दोन वर्षांपूर्वी मंदिरावर कळस बसविण्यात आला आहे त्यासाठी सांगलीहून कारागिरांना बोलविण्यात आले होते. मंदिरासमोर हवनकुंड असून त्यात अखंड ज्योत असते. पंचकमेटीतर्फे जुन्या मूर्तीला चांदीचा मुलामा केला असून प्रास्तावित अखंज ज्योतगृहाचे बांधकाम तसेच मंदिराच्या गाभाऱ्याचे मुख्यप्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे.नवरात्र उत्सवात होमहवन, भजन , आणि महाप्रसाद आयोजित केला जातो. मंडळातर्फे वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. दिवसेंदिवस नंदनवन भागात असलेल्या या मंदिराचे स्वरुप बदलत असताना नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत आहे. अनेक भाविकांना प्रचिती आल्यामुळे या मंदिराकडे श्रद्धास्थान म्हणून बघितले जाते. मंदिराचे बरेच काम अजून व्हायचे असून ते येणाऱ्या काळात लवकरच पूर्ण होईल असेही सरोदे म्हणाले.