मुक्त संवादातून उलगडली संघर्षांची गाथा! Print

नागपूर / प्रतिनिधी
चाकोरी पद्धतीने जीवन न जगता वेगळया वाटेने प्रवास करणाऱ्या चार ‘आयकॉन’ने यशाचे शिखर गाठताना केलेल्या संघर्षांची गाथा मुक्त संवादातून उलगडली. आर्य वैश्य यूथ क्लबच्यावतीने शंकरनगरातील साई सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘द रोड नॉट टेकन’अंतर्गत ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, डॉ. सतीश गोगुलवार, लेफ्टनंट कमांडंट स्वाती तोटावार व विजय उत्तरवार यांनी मुक्त संवादातून त्यांचा जीवन प्रवास श्रोत्यांसमोर मांडला.
कन्यका देवीच्या प्रतिमेसमोर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. जगावेगळा मार्ग स्वीकारणाऱ्या चौघांसोबत अजय गंपावार यांनी मुक्त संवाद साधून त्यांना बोलते केले. तंबी दुराई हा  साऊथ इंडियन माणूस कोण? असा प्रश्न श्रीकांत बोजेवार यांना विचारताच त्यांनी ‘तंबी दुराई’ सांगतानाच जीवनप्रवास कथन केला. ‘तंबी दुराई’ मुंबईवरून माझ्यासोबत येणार होता, पण मीच त्याला येऊ नको म्हटेल, नाहीतर तुझ्यासोबत मलाही मार खावा लागेल. तंबी दुराई या नावाने लोकसत्तामधून दहा वर्षे ‘दोन फूल एक हाफ’ या नावाने स्तंभलेखन केले. बारावीनंतर ‘आयटीआय’ केले आणि नोकरीसाठी मुंबई गाठली. एका इलेक्ट्रॉनिक कंपनी काम मिळाले. मुंबईत एका वृत्तपत्रात शिकावू पत्रकार म्हणून कामाला लागलो. वाचनाचे संस्कार वडिलांकडूनच मिळालेले होते, त्यामुळे वाचन आणि लेखन वाढत गेले, अशा पद्धतीने वाटचाल सुरू झाली. तंबी दुराई दुसरा कोणी नसून श्रीकांत बोजेवार यांनीच त्या नावाने लेखन केल्याचा उलगडा अखेर श्रोत्यांना झाला.
वेगळे काही करण्याच्या इच्छा होती म्हणूनच आज तुमच्यासमोर या गणवेशात दिसते आहे, असे नौदलाची लेफ्टनंट कमांडंट स्वाती तोटावार म्हणाली.
काही प्रसंग सांगताना स्वाती तोटावार हळवी झाली आणि तिचे डोळेही पान्हावले.
वडिलांना कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यावर आई हादरून गेली होती. मुलगी लग्न होऊन सासरी जावी, अशी आईवडिलांची इच्छा होती. माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले होते. मला एका बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली होती. सर्व काही ठीक चालले असतानाच वेगळे काही करण्याची इच्छा मनात होती. शाळेत शिकत असताना ‘रिपब्लिक परेड’ पाहून आपणही देशासाठी काही करावे, अशी इच्छा निर्माण झाली आणि नौदलात दाखल होण्यासाठी मी परीक्षेची तयारी सुरू केली. यासाठी मला भावजींचे मार्गदर्शन मिळाले. भोपाळला परीक्षा झाली. वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी निवड झाली. आज मी  लेफ्टनंट कमांडंट आहे. याचा माझ्या कुटुंबाला, समाजाला अभिमान वाटतो. स्वाती माझा मुलगाच आहे, असे वडील म्हणायचे, ही आठवण सांगताना स्वाती भावुकझाली होती.
तुम्ही ‘जेपीं’च्या  चळवळीकडे आकर्षित झाले आणि डॉक्टर झाल्यानंतर समाजसेवेची वाट का निवडली? असे विचारले असता डॉ. सतीश गोगुलवार म्हणाले, मी मध्यमवर्गीय व्यापारी कुटुंबात जन्माला आलो, आम्ही दोन भाऊ. एकाने डॉक्टर व एकाने इंजिनिअर व्हावे ही वडिलांची इच्छा होती. त्याप्रमाणे माझा भाऊ इंजिनिअर झाला आणि मी वैद्यकीय क्षेत्राकडे वळलो. नागपूरला ‘एमबीबीएस’च्या शेवटच्या वर्षांला असताना जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत ओढल्या गेलो. डॉक्टर झाल्यानंतर दुर्गम भागात आरोग्य सेवा पुरविण्याचा निर्धार केला.  
सॉप्टवेअर कंपनी ते कन्झुमर प्रॉडक्ट तयार करणे हा प्रवास कसा? असे विचारले असता विजय उत्तरवार म्हणाले, अमेरिकेत १५ वर्षे राहिल्यानंतर देशासाठी काही करावे असे वाटले आणि मायदेशी परतलो. अजूनही खूप काही मिळवायचे आहे. माझी काही निरीक्षणे आहेत. कोणतेही काम करण्यासाठी त्या कामाची मनात आवड असली पाहिजे, कठीण परिश्रम घेण्याची तयारी असेल तर यश निश्चितच मिळते. मायदेशी परतल्यानंतर शेतकऱ्यांसाठी काम करणे सुरू केले. सचिन गंपावार यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.