ग्लोबल वार्मिगने प्राण्यांच्या जीवनचक्रात आश्चर्यकारक बदल! Print

*  नव्या संशोधनातील इशारा *  निसर्गचक्रच बदलतेय
विक्रम हरकरे , नागपूर
‘ग्लोबल वार्मिग’मुळे समुद्री जलचर आणि अन्य प्राणी प्रजातींच्या जीवनचक्रात आश्चर्यकारक बदल होत आहेत. ‘ग्लोबल वार्मिग’ ने प्राण्यांचे पुनरुत्पादन आणि अधिवास यावर होत असलेले गंभीर परिणाम आता पर्यावरणतज्ज्ञांच्या चिंतेचा विषय झाले आहेत. प्राण्यांच्या नित्याच्या जीवनचक्रातील बदलांच्या आधारे पक्षी, मासे आणि समुद्रातील अन्य प्राण्यांच्या बदलत्या वर्तणुकीवर अलीकडे प्रसिद्ध झालेले संशोधन धक्कादायक आहे. प्राण्यांची जैविक घडय़ाळच यामुळे विस्कळीत आणि अनैसर्गिक झाल्याचा निष्कर्ष यातून काढण्यात आला आहे.
वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या समुद्री जीव संशोधन विभागाचे मानद सल्लागार बी.सी. चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्लोबल वार्मिगमुळे समुद्राच्या पातळीत होत असलेली वाढ, तापमानातील वारंवार बदल आणि समुद्रात उठणाऱ्या लाटांच्या असंतुलनाने समुद्री जीवांची वर्तणूक बदलली आहे. शिवाय त्यांचे नियमित नैसर्गिक जीवनही बाधित झाले आहे. याचे परिणाम त्यांच्या प्रजोत्पादनाच्या चक्रावर होऊ लागले आहेत. ग्लोबल वार्मिगचे परिणाम समुद्री जीवांवर सर्वाधिक जाणवू लागले असून पर्वतीय प्रदेशातील वनस्पतींच्या जीवनचक्रालाही यामुळे बाधा पोहोचत आहे. उंच पहाडी प्रदेशातील कीटक आणि या कीटकांवर जगणारे पक्षी यांचेही नैसर्गिक चक्र बदलत आहे. परिणामी त्यांचे जैविक चक्र आणि भक्ष्यांची पोत यात बदल झाले आहेत.
मुरेल फिशच्या चार प्रजाती राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्य़ात आढळतात. हा मासा पाण्यास श्वसन करण्याबरोबरच हवेतील ऑक्सिजन थेट ओढू शकतो. हा मासा पाण्यातील वनस्पतींमध्ये किंवा समुद्रातील आडोशाला स्वत:चे घर बांधून त्यात अंडी देणारी दुर्मीळ प्रजाती आहे. नद्यांमध्ये आढळणारा मुरेल मासा मे आणि जून महिन्यात अंडी घालतो.
 यादरम्यान पाण्याचा प्रवाह संथ असल्याने त्याची अंडी वाहून जाण्याचा धोका कमी असतो. हा क्रम आता बदलला असल्याचे लक्षात आले आहे. प्रजोत्पादनाचा नैसर्गिक काळ उलटल्यानंतरही त्यांची अंडी देण्याची प्रक्रिया सुरू राहत आहे. चंबळच्या नदीतील संशोधनातून हे उघड झाले आहे.  
चंबळच्या खोऱ्यात आढळणारे स्थलांतरित बदक (डक पिनटेल) अंटाक्र्टिकातून येते. साधारण ऑक्टोबर महिन्यात यांचे भारतात आगमन सुरू होते.
परंतु, यंदा ही पक्षी प्रजाती सप्टेंबरपासूनच भारतात दिसू लागली आहे. लांडोरची पिल्ले साधारण फेब्रुवारी जे जुलैदरम्यान जन्माला येतात, असे निरीक्षण आहे. मात्र, या निसर्गक्रमात बदल जाणवू लागला असून मोरांच्या प्रजातीचे प्रजनन सप्टेंबरच्या प्रारंभीच होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा परिणाम ग्लोबल वार्मिगचा आहे. सापांच्या वर्तणुकीतही बदल होत असल्याचे आढळत आहे. वातावरणातील वाढते तापमान आणि आद्र्रता यामुळे सापांचा अंडी देण्याचा कालखंड बदलला आहे. कोब्रा, धामण आणि अन्य सर्पप्रजाती जोडय़ांनी आढळू लागले असून शत्रूवर आक्रमणास तयार असल्याचे सिद्ध होत आहे. याचा अर्थ त्यांची आक्रमकता वाढली असाच काढला जात आहे. सर्पदंशाच्या घटनांतही गेल्या काही वर्षांत अचानक वाढ झाली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतरित जीवांवर झालेल्या परिषदेत पक्षी, कासव, डॉल्फिन आणि व्हेल यांना ग्लोबल वार्मिगचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला होता. ग्लोबल वार्मिगमुळे समुद्राच्या पाण्याच्या वाढलेल्या पातळीत असंख्य समुद्री जलचरांच्या प्रजाती नष्ट झाल्याचेही आढळून आले आहे.
ज्येष्ठ पर्यावरणवादी रझा एच. तेहसीन आणि त्यांची कन्या अरेफा यांनी यासंदर्भात मौलिक संशोधन केले आहे.