अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांचा कायदेशीर सल्लागारपदाचा राजीनामा Print

अधिवक्त्यांसाठी विद्यापीठाची जाहिरात
नागपूर / प्रतिनिधी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठने न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी अधिवक्तयांसाठी जाहिरात देऊ केली असून अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या कायदेशीर सल्लागार पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. विधिसभा सदस्य समीर केने यांनी माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण यांच्या काळातील विधिसभांमध्ये भानुदास कुलकर्णीच्या विरोधात प्रश्न विचारून प्रकरण लावून धरले होते. त्यात कुलकर्णीना मिळणारे मानधन, न्यायालयात विद्यापीठाच्या बाजूने लागलेले निकाल, विद्यापीठाच्या विरोधात लागलेले निकाल इत्यादी संबंधीची माहिती विद्यापीठाला विचारून केने यांनी विद्यापीठात रान उठवले होते. गेल्या विधिसभेत तर त्याच विषयावरील त्यांचा प्रश्न विद्यापीठाने व्यक्तिगतरित्या कुणावर आरोप करता येत नाहीत म्हणून नाकारला होता. कुलकर्णीच्या दबावाला बळी पडून विद्यापीठाने प्रश्न नाकारल्याचा आरोप त्यावेळी त्यांनी केला होता. याहीवेळी येत्या ३ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधिसभेत कुलकर्णीच्याच विरोधात केने यांनी प्रश्न टाकला होता, मात्र त्यापूर्वीच अ‍ॅड. कुलकर्णी यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. समीर केणे यांचे कुलकर्णीनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताचे स्वागत केले असून विद्यापीठाने यापुढेही कुलकर्णी विद्यापीठाच्या लीगल पॅनलवर राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अशोक गोमासे यांनी कुलकर्णींनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विद्यापीठाच्या अधिसूचनेनुसार विद्यापीठासंबंधी कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय, विद्यापीठ व महाविद्यालये न्यायाधिकरण, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि इतर फोरम्स व ट्रिब्युनल्समध्ये दिवाणी, फौजदारी, कामगार तसेच इतर कायदेशीर कर्यवाहीविषयक दाखल असलेली न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याकरता वर्गनिहाय अधिवक्तयांच्या नियुक्तीविषयी सूची तयार करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव असलेल्या इच्छुक उमेदवरकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिवक्तयांच्या सूचीमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात दिल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत अर्ज पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे.