शासकीय रुग्णालयांमध्ये रक्तासाठी वणवण Print

‘पैसे मोजा रक्त घ्या’ नवे घोषवाक्य
नागपूर / प्रतिनिधी
‘रक्तदान-श्रेष्ठदान’ या घोषवाक्याचा जनजागृती कार्यक्रमातून प्रचार केला असला तरी प्रत्यक्षात मात्र, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आलेल्या गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी वणवण भटकावे लागत आहे. ‘पैसे मोजा आणि रक्त घ्या’ या नव्या घोषवाक्याची दलालामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अंमलबजावणी केली जात आहे.   
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)मध्ये रोज चार राज्यातील हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. मेडिकल रुग्णालय हे समाजातील गोरगरीब रुग्णांसाठी उपचारासाठी प्रसिद्ध असल्याने गरीब आणि दारिद्रय़रेषाखाली अनेक रुग्ण या ठिकाणी आशेने उपचारासाठी येत असतात पण, मेडिकलमध्ये प्रत्येक ठिकाणी पैसा द्यावा लागत असल्याने गरीब रुग्णांचे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मेडिकलमध्ये असलेल्या ब्लडबँकमध्ये मोठय़ा प्रमाणात रक्ताचा साठा उपलब्ध असताना अनेक रुग्णांना संबंधित गटाचे रक्त नसल्याचे सांगून परत पाठविले जाते. असले तरी त्यांच्याकडून पैसे आकारले जात असल्याची माहिती रुग्णांच्या एका नातेवाईकांनी दिली. गेल्या १८ ऑक्टोबरला गोंदिया जिल्ह्य़ातील एक रुग्ण कुटुंबासह मेडिकमध्ये उपचारासाठी आला होता. रुग्ण फारच अशक्त असल्याने त्याला रक्ताची आवश्यकता होती. संबंधीत डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या गटाचे रक्त घेऊन येण्यास सांगितले. नातेवाईकांनी अनेक खाजगी ब्लड बँकमध्ये संपर्क केला मात्र, त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. रुग्णाला रात्री दाखल केल्यामुळे अनेक रक्तपेढय़ा झाल्या होत्या त्यामुळे मेडिकलच्या ब्लड बँकमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी चौकशी केली मात्र, त्यांना तिथेही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मेडिकल परिसरात एका दलालाच्या माध्यमातून प्रयत्न करा असा सल्ला एका कर्मचाऱ्याने दिल्यावर त्यांनी संबंधीत दलालाची भेट घेतली मात्र, कुटुंब गरीब असल्याने दलालाने मागणी केली तेवढा पैसा त्यांच्याकडे नव्हता, त्यामुळे त्याच्याशी चर्चा फिस्कटली. रुग्ण अत्यवस्थ असून त्याला रक्ताची आवश्यकता असताना त्यांनी नागपूरमध्ये राहणाऱ्या मित्राला माहिती दिली. त्या मित्रानी रुग्णालयातील एका अधिकाऱ्यांकडे मेडिकलच्या ब्लड बँकेतून रक्त देण्याची मागणी केली. त्या अधिकाऱ्याने रक्तपेढीतील कर्मचाऱ्याला सांगितले मात्र दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत रुग्णाला रक्त मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे तक्रार केली असता अधिकाऱ्याने लागलीच त्याची दखल घेत संबंधीतांना रक्ताचा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. रक्त उपलब्ध असतानाही रुग्णाला ते उपलब्ध करून देण्यात न आल्याने रात्रभर रुग्णाला रक्तापासून वंचित राहावे लागले. दरम्यान रक्ताअभावी रुग्णाचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान वैद्यकीय उप अधीक्षक डॉ. वासुदेव बारसागडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रक्ताची कमतरता नाही. रुग्णांना हवे असलेल्या प्रत्येक गटाचे रक्त उपलब्ध आहे. कर्मचारी जाणूनबूजन रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास देत असतील त्याची चौकशी करून संबंधीताला ताकिद देण्यात येईल. रुग्णसेवा ही आमच्यासाठी सर्वोच्च सेवा आहे, असे सांगून झालेल्या घटनेबद्दल बारसागडे यांनी दिलगिरी व्यक्त केली.