उदंड जाहल्या चोऱ्या.. Print

नागरिकांत चिंता, पोलिसांसमोर आव्हान
किरण राजदेरकर , नागपूर
शहरात गेल्या नऊ महिन्यात सहाशेहून अधिक घरफोडय़ा तर दीड हजाराहून अधिक चोऱ्या झाल्या असून रोज सरासरी एक घरफोडी होत आहे. ‘उदंड जाहल्या चोऱ्या’ असेच म्हणण्याची वेळ नागरिकांसह पोलिसांवरही आली आहे.


शहर पोलिसांकडून उपलब्ध माहितीनुसार, गेल्यावर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबरदरम्यान शहरात ६७२ घरफोडय़ा झाल्या. त्यापैकी १८४ घटनांचा तपास लागला. यंदा १ जानेवारी ते ३० सप्टेंबरपर्यंत शहरात ६२४ घरफोडय़ा झाल्या. गेल्यावर्षी चोऱ्या (वाहन व इतर) २ हजार २८६ झाल्या. यावर्षांत ३० सप्टेंबपर्यंत चोऱ्या १ हजार ७६५ झाल्या. या ऑक्टोबर महिन्यात पन्नासहून जास्त चोऱ्या तसेच घरफोडय़ा झाल्या. रोज सरासरी चार घरफोडय़ा शहरात होत आहेत. पूर्वी कुलूप तोडून घरफोडय़ा होत होत्या. एकूणच घरफोडय़ांचे प्रमाणही कमी होते. दिवसेंदिवस घरफोडय़ांचे प्रमाण वाढले आहे. आता तर थेट कुलूपकोंडा तोडून घरफोडय़ा होत असून त्यांचे प्रमाणही जास्त आहे. खिडकीचे ग्रिल तोडून अथवा काढूनही घरफोडय़ा अधूनमधून होतात. घरात कुणी नसल्याचे पाहून चोरटे नेमके संधी साधतात. दाट किंवा विरळ लोकवस्तीत असो वा फ्लॅट इमारत, कुलूपकोंडा तोडण्याची मजल चोरटय़ांची गेली आहे. याच महिन्यात प्रतापनगरमधील तीन अपार्टमेंट्समध्ये दोनवेळा प्रत्येकी चार फ्लॅट्स फोडण्यात आले. कुलूपकोंडा तोडण्याचा आवाज शेजाऱ्यांना ऐकूजात नाही का, असा प्रश्न सर्वापुढे निर्माण होतो. उत्तररात्री गाढ झोपेच्यावेळी या घरफोडय़ा होतात. मात्र, आताशा दिवसाढवळ्याही त्या होत आहेत.
अनेक इमारतींमध्ये रखवालदार ठेवला जात नाही. रखवालदार असलेल्या इमारतींमध्ये घरफोडय़ा होत असल्याने पोलीसही अनेकदा अवाक् होतात. घरफोडय़ांचे वाढते प्रमाण नागरिकांची चिंता वाढवणारे ठरले आहे. घरच सुरक्षित नाही, असा याचा अर्थ निघतो. सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीस आहेत कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडतो. वाढत्या चोऱ्या वा घरफोडय़ांमुळे पोलीसही हैराण झाले आहेत. त्याचे प्रमाण एवढे वाढले आहे की पोलिसांनाही त्याचे गांभीर्य वाटेनासे झाले आहे. थोडक्यात ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी स्थिती झाली आहे. अधूनमधून आरोपी पकडले जात असले तरी घरफोडय़ांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. चोऱ्या व घरफोडय़ांचे प्रमाण वाढले असूनही तपासाचे प्रमाण मात्र त्याप्रमाणात समाधानकारक नाही. हे प्रमाण पुरते तीस टक्केही नाही.
लोकसंख्या जास्त, क्षेत्र मोठे आणि पोलिसांचे मनुष्यबळ कमी अशी परिस्थिती झाली आहे. पोलिसांचा अध्र्याहून अधिक वेळ बंदोबस्तात जातो. शिल्लक वेळेत पोलीस कुठेकुठे लक्ष देणार.  नागरिकांनीही सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. पोलिसांचे वाहन प्रत्येक भागात फिरत असते. याशिवाय दुचाकीवरही दोन शिपाई फिरतच असतात, तरीही पोलीस आरोपींना पकडतात, असे पोलीस सांगतात. केवळ पोलिसांना दोष न देता नागरिकांनीही काळजी घ्यायला हवी, असे मत पोलीस आयुक्त डॉ. अंकुश धनविजय यांनी व्यक्त केले. चोऱ्या, घरफोडय़ा वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिक व पोलीसही हैराण झाले आहेत.
पोलिसिंग ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही. नागरिकांचीही काही अंशी जबाबदाारी आहे.  किमान प्रतिबंधक उपायही नागरिक करीत नाहीत. रोज किमान दोन नागरिक गस्त घालण्यास पुढे आले तर त्यांच्याबरोबर दोन सशस्त्र पोलीस गस्त घालतील. कॉलनी अथवा फ्लॅट्स असेल तर दर महिन्याला आर्थिक सहयोगातून एक खाजगी सुरक्षा रक्षक नेमावा. वाहनांना अथवा घरात अलार्म सिस्टिम लावावी, हे उपाय फार खर्चिक नसून नागरिक करू शकतात, असे पोलीस आयुक्त म्हणाले.      

पोलिसांच्या सूचना
१) वाहन, दार, दाराचा कडीकोंडा तसेच कुलूप भक्कम असावे. तकलादू नको.
२) खिडकीचे ग्रिल स्क्रु लावलेले नको तर ते भिंतीत पक्क्क्या रोवल्या असाव्या.
३) शक्य आहे तेथे सी. सी. कॅमेरे लावा.
४) मौल्यवान वस्तू, रक्कम बँकेत लॉकर्समध्ये ठेवा.
५) बाहेरगावी जात असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात सूचना द्या. पोलीस लक्ष ठेवतील, गस्त घालतील.
६) घर, दुकाने, प्रतिष्ठाने, कार्यालय, वाहनांना अलार्म सिस्टिम लावा.
७) किमान दोन नागरिक गस्त घालण्यास पुढे आले तर त्यांच्याबरोबर दोन सशस्त्र पोलीस गस्त घालतील.
८) कॉलनी अथवा फ्लॅट्स असेल तर दर महिन्याला आर्थिक सहयोगातून एक खाजगी सुरक्षा रक्षक नेमा.