ऑटोमोबाईल्समध्ये मोठी उलाढाल Print

* दसरा, दिवाळीसाठी बाजारपेठ सजली
* डिझेल वाहनांकडे ग्राहकांचा कल
दिलीप शेळके ,   नागपूर ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

दसरा व दिवाळी सणांसाठी बाजारपेठ सजली असून ऑटोमोबाईल्समध्ये मोठी उलाढाल होणार आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीकडे ग्राहकांची मोठा कल आहे. डिझेल वाहनांकडे यावेळी ग्राहक मोठय़ा संख्येने आकर्षित होत आहे. ऑक्टोबर महिन्यात नागपुरात आतापर्यंत  ग्राहकांनी २ हजार ७८७ मोटारसायकल्स आणि १ हजार ६८३ कारची खरेदी केली असून या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी झाली आहे.

ग्राहक विजयादशमीच्या दिवशीही मोठय़ा प्रमाणात वाहनांची खरेदी करतील. यापेक्षाही सर्वाचा आनंदाचा सण असलेल्या दिवाळीला मोठी उलाढाल होईल, असा अंदाज शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनांचे अग्रगण्य विक्रेते ताजश्रीचे अविनाश भुते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.
शहरात ताजश्री समूहाला चार डिलरशीप मिळालेल्या आहेत. ताजश्री अशोक ले लॅण्ड, ताजश्री शेवर्ले, ताजश्री यामाहा आणि ताजश्री होंडा अशा त्यांच्या शोरूम्स आहेत. शहरात चारचाकी गाडय़ांच्या डझनभर शोरूम्स आहेत. सर्वच कंपन्यांच्या शोरूम्समध्ये नवीन गाडय़ा दाखल झाल्या आहेत.
 लाईट कमर्शियल व्हाईकलमध्ये (एलसीव्ही) अशोक लेलॅण्डच्या ‘दोस्त’ मध्ये चांगली वाढ होत आहे. या महिन्यात  ९० च्यावर ही वाहने ग्राहकांना देऊ आणि पुढील महिन्या शंभरच्यावर वाहने देण्याचे लक्ष्य आहे. होंडाच्या वाहनांमध्ये ४० टक्के वाढ झाली असून अ‍ॅक्टिव्हा, डीओची वाढ ५० टक्के आहे. आम्ही या महिन्यात होंडय़ाच्या १२०० गाडय़ा ग्राहकांना देणार आहोत. शेवर्लेची डिलरशीप घेऊन आत नऊ महिने होत आहेत. दर महिन्याला सरासरी ४५ गाडय़ांची विक्री होत आहे. या महिन्यात ७० गाडय़ा ग्राहकांना देण्यात येणार आहेत. यामध्ये ‘सेल’ ही नवीन गाडी बाजारात येत आहे. यामाहा मोटारसायकल्सची विक्री दर महिन्याला सरासरी साडेपाचशेपर्यंत आहे. या महिन्यात यामाहाच्या ७०० मोटारसायकल्सची विक्री होणार असून पुढील महिन्यात दिवाळीला ही विक्री १२०० पर्यंत जाणार आहे. विदर्भात ताजश्री अशोक ले लॅण्डचा बाजारपेठेतील वाढीचा वाटा २३ टक्के आहे. नागपुरात ताजश्री शेवर्लेचा वाटा ५ टक्के, ताजश्री यामाहा १८ टक्के तर ताजश्री होंडाचा वाटा ५० टक्के असल्याचे भुते यांनी सांगितले.
या सणानिमित्ताने टाटा, महेंद्र, मारुतीच्या विविध प्रकारची वाहने बाजारात आली आहे. नागपुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात या महिन्यात रविवापर्यंत  २ हजार ७८७ मोटारसायकल्स आणि १ हजार ६८३ कारची नोंदणी झाली आहे. यामध्ये शहर कार्यालयात ७८७, पूर्व कार्यालयात दोन हजार  मोटारसायकल्सची नोंदणी झाली आहे. शहर कार्यालयात ३६६ कारची तर पूर्व कार्यालयात १३१७ कारची नोंदणी झाल्याचे सहप्रादेशिक परिवहन अधिकारी सुधाकर दाणी व पूर्व कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ह.श. गडसिंग यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.