गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा शुल्क राज्यात सर्वाधिक Print

नागपूर / खास प्रतिनिधी  ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यांला शिक्षण घेणे सोयीचे जावे, या हेतूने राज्यातील विद्यापीठे कमीतकमी शुल्काची आकारणी करीत असताना आदिवासी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा शुल्क बघून गरीब विद्यार्थ्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. नक्षलवादग्रस्त पूर्व विदर्भातील गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्य़ात दर्जेदार शिक्षणाची सोय व्हावी, या हेतूने जेमतेम एक वर्ष झालेले गोंडवाना विद्यापीठ कायम या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहे. आता या विद्यापीठाने परीक्षांसाठी भरमसाठ शुल्क आकारून गरीब विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आरंभापासून सेमिस्टर पद्धतीचा अवलंब करणाऱ्या या विद्यापीठाच्या सहामाही परीक्षा आता सुरू होत आहेत. त्यासाठी परीक्षा अर्ज सध्या स्वीकारले जात आहेत. या अर्जासोबत जमा कराव्या लागणाऱ्या परीक्षा शुल्काचा आकडा बघून अनेकजण चक्रावले आहेत. या विद्यापीठाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदा तब्बल २५३५ रुपये शुल्क आकारले आहे. संपूर्ण राज्यात एवढे शुल्क कोणत्याही विद्यापीठात नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास अमरावती विद्यापीठात ६२० रुपये, पुण्यात ७२०, मराठवाडय़ात ६२० व नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात २ हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. इतर विद्यापीठाच्या तुलनेत जादा शुल्क आकारून गोंडवाना विद्यापीठाला नेमके कुणाचे हीत साधायचे आहे, असा सवाल आता त्रस्त विद्यार्थ्यांनी केला, अशी माहिती आमच्या चंद्रपूरच्या प्रतिनिधीने दिली.
इतर विद्यापीठांच्या तुलनेत गोंडवानाचे विलंब शुल्क सुद्धा अधिक आहे. नागपूर विद्यापीठात ५० रुपये विलंब शुल्क आहे. गोंडवाना विद्यापीठात तब्बल ६०० रुपये विलंब शुल्क आकारले जात आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दरवर्षी शिक्षण शुल्क आकारले जाते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रती वर्षी दीड हजार रुपये शुल्क घेतले जाते. या शुल्काच्या कितीतरी पट जास्त परीक्षा शुल्क या विद्यापीठाकडून आकारले जात आहे. सेमिस्टर पद्धतीमुळे या दोन जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांना वर्षांला दोन परीक्षा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे केवळ परीक्षा शुल्कापोटी या विद्यार्थ्यांना वर्षांला ५ हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. राज्यातील इतर विद्यापीठाच्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे. गोंडवाना विद्यापीठाने यंदा परीक्षेसंबंधीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. विद्यार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातूनच परीक्षेचे अर्ज भरावे लागणार आहेत. प्रशासकीय प्रक्रिया ऑनलाईन करणे यात काही गैर नसले तरी हे करताना आपले विद्यापीठ नेमके कोणत्या भागात कार्यरत आहे, याचा विसर या विद्यापीठाच्या प्रशासनाला पडला आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ातील अनेक तालुके दुर्गम भागात आहेत. या तालुक्यांमध्ये ऑनलाईन सेवा उपलब्ध नाही. तेथील विद्यार्थ्यांचा विचार या विद्यापीठाने अजिबात केलेला नाही. चंद्रपूर जिल्ह्य़ातील जिवती तालुक्यातही ऑनलाईन सेवा उपलब्ध नाही. या दोन जिल्ह्य़ातील काही तालुके असे आहेत की, जेथे ही सेवा उपलब्ध असूनही पूर्ण क्षमतेने काम करत नाही. गडचिरोली जिल्ह्य़ात तर दूरसंचार सेवा ठप्प कशी करता येईल, यावरच नक्षलवाद्यांचा भर राहिला आहे. त्यामुळे या जिल्हय़ात अनेक भागात साधा फोनही काम करत नाही. अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनची सक्ती करून या विद्यापीठाला नेमका कोणता हायटेक विकास साधायचा आहे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. परीक्षेचे अर्ज भरण्याच्या तारखेवरूनही या विद्यापीठात कमालीचा गोंधळ आहे. दोन दिवसापूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना तातडीने अर्ज सादर करा, असे निरोप देण्यात आले. त्यामुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांची अडचण झाली. नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराने भयग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी या विद्यापीठाची निर्मिती झाली असली तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. या संदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांच्याशी संपर्क साधला असता शुल्काविषयी परीक्षा नियंत्रकच माहिती देऊ शकतील, असे ते म्हणाले. परिक्षा नियंत्रक डॉ. अर्चना लोगो यांच्याशी संपर्क साधला असता थोडय़ा वेळात बोलते असे सांगत त्यांनी फोन बंद केला. नंतर प्रत्येक वेळी त्या बैठकीत असल्याचे सांगण्यात आले.