नागपूर जिल्ह्य़ात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व Print

नागपूर / प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्य़ात झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ११७ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला असून राष्ट्रवादी काँग्रेसने काटोल, नरखेड आणि काँग्रेसने उमरेड, भिवापूर, कुही ग्रामपंचायतीवर घवघवीत यश संपादन केले आहे. उमरेड तालुक्यात बेलामध्ये पूर्ती साखर कारखाना परिसरात भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला.
रविवारी नागपूर जिल्ह्य़ात घेण्यात २४९ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ग्रामपंचायतीवर विजय मिळविला आहे. जिल्ह्य़ात सर्वात जास्त ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळाले असले तरी भाजपचा गड असलेल्या काही ग्रामपंचायतमध्ये पराभव झाला.
काटोल तालुक्यामध्ये २६ पैकी २१ ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थित पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहे. नरखेड तालुक्यातील २२ पैकी खेडी ग्रामपंचायत बिनविरोध असून उर्वरित १८ ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले आहे. हिंगणा तालुक्यात २, नागपूर ग्रामीण ८, कळमेश्वर २, सावनेर ५, भिवापूर २, पारशिवणी ९, मौदा २, रामटेक ३, कुही मध्ये २ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण ७७ ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि उपसरंपच  होतील, असा विश्वास जिल्हा अध्यक्ष बंडू उमरकर यांनी व्यक्त केला.
उमरेड तालुक्यात एकूण सात ग्रामपंचायतीमध्ये ठोंबरा, आपतूर, मकरधोकडा, सिर्सी, सावंगी, बेला या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. भिवापूर तालुक्यात बारापैकी आठ ग्रामपंचायतीवर काँग्रेसने विजय संपादन केला. त्यात कारगाव, बेसूर, गोंडबोरी, मांगरुड, सरांदी, मरुपार, टाका, पांढरवाणी या गावांचा समावेश आहे. दोन जागी भारतीय जनता पक्ष आणि एक जागा शिवसेनेने जिंकली. कुही तालुक्यात सात ग्रामपंतचायतीपैकी सहा जागी काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविला. मांढळ, तारोली, जिवनापूर, खराडा, वग, डोंगरमौदा या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.