धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी गजबजली Print

पुस्तके, कॅसेट आणि कॅलेंडर खरेदी जोरात
नागपूर / प्रतिनिधी
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीमसैनिकांनी दीक्षाभूमी गजबजू लागली तशी आजूबाजूची बाजारपेठही गजबजू लागली आहे.
देशभरातील धम्मबांधवांना दीक्षाभूमीचे खास आकर्षण पुस्तकांची असल्याने नागपुरातील दीक्षाभूमीवर दरवर्षी कोटय़वधी रुपयांची उलाढाल दसऱ्यादरम्यान होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने होत असते. त्यामुळे दरवर्षी नवीन प्रकाशक, पुस्तक विक्रेत्यांची भर दीक्षाभूमीवर होत असल्याने जवळपास पावणेदोनशे स्टॉल दीक्षाभूमीच्या परिसराच्या आत आणि परिसराबाहेरील चहुदिशांनी लागले आहेत. शासकीय ग्रंथालय व मुद्रालणालयाने लावलेल्या छोटय़ाशा स्टॉलवर डॉ. आंबेडकरांचे ग्रंथ खरेदीसाठी गर्दी झाली असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज आणि उद्या, बुधवारी दोन दिवसांत संपूर्ण खंडांची विक्री होईल, असा स्टॉलधारकांचा अंदाज आहे. दरवर्षी एकही पुस्तक आम्ही परत घेऊन जात नाही तर संपूर्ण पुस्तकांची विक्री या दोन दिवसांत होते. दसऱ्याच्या दिवशी अलोट गर्दी होत असल्याने आदल्यादिवशी म्हणजे आजही अनेक लोक संपूर्ण खंडाचा संच घेण्यासाठी येतात.
पुस्तकांव्यतिरिक्त नवीन वर्षांच्या डायऱ्या, कॅलेंडर, बुद्ध व डॉ. आंबेडकरांच्या मूर्ती, कपडे, प्रवासी बॅग, व्हिडिओ कॅसेट, बिल्ले, पेन, किचेन, बिसलरी व पाण्याचे पाऊच, डॉ. आंबेडकर व बुद्धाची छायाचित्र आणि इतर वस्तूंचे स्टॉल सजले आहेत. यासर्व वस्तू काही सूट किंवा कमी भावात विकत मिळत असल्याने भीमसैनिकांचा त्याकडे ओढा असतो. गेल्या ३५ वर्षांपासून स्टॉलधारक नित्य नियमाने स्टॉल लावत असल्याने बाहेर गावाहून येणाऱ्या भीमसैनिकांनाही पुस्तकांचे स्टॉल, आरोग्य विषयक स्टॉल, बँकासंबंधी, चष्मा मिळण्याचे स्टॉल यांची माहिती असते. त्यामुळे दरवर्षी डॉक्टर आणि त्यांच्या रुग्णांची हमखास भेट होण्याचे स्थान म्हणजे स्टॉलची जागा होय. पुस्तकांपाठोपाठ डीव्हीडींची विक्री फार मोठय़ा प्रमाणात होते. भीमगीते आणि बुद्धगीतांच्या जुन्या-नवीन गाण्यांची कॅसेट घेऊन जाण्याची बहुतेकांची धडपड असते. पुस्तके आणि कॅसेट पाठोपाठ गेल्या दोन-तीन वर्षांपासून दीक्षा ‘जयभीम’, ‘लेणी संवर्धन समिती’, ‘महाबोधी’ आदींसारखी कॅलेंडर मोठय़ा संख्येने येऊ लागली आहेत. कॅलेंडर भेट देण्यासाठीही उपयोगी पडत असल्याने एकावेळी तीन-चार कॅलेंडर घेऊन जाण्याचीही वृत्ती भीमसैनिकांत वाढली आहे. त्यामुळे इतर परंपरागत कॅलेंडरला नाकारून आता डॉ. आंबेडकरांच्या चळवळींच्या ऐतिहासिक नोंदी व त्यांची एकूण कारकीर्द आणि तथागत गौतम बुद्धाचे जीवन चरित्र सांगणारे कॅलेंडर्स भीमसैनिकांना पसंत पडू लागल्याने त्यांचीही विक्री मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसते. बुद्धाच्या मूर्तींना दरवर्षीच हमखास ग्राहक असतोच.
याशिवाय ढोकळा आणि मुरमुऱ्यांचा चिवडा घेऊन विक्रेते गर्दीमधून फिरत असतात. मेहंदी काढणारे किंवा गोंदणारेही दीक्षाभूमीवर हजर असतात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला गर्दीही भरपूर असते. फॅशन म्हणून गळ्यात किंवा हातात घालणारे बिट्स दोन रुपयांना एक याप्रमाणे मिळतात. आगामी दिवाळी लक्षात घेऊन रांगोळीवाले देखील दीक्षाभूमीच्या गर्दीचा फायदा उठवायला मागे नसतात. रांगोळ्यांचे छापेही याठिकाणी विक्रीस असतात. त्यामुळेच दीक्षाभूमीवर दरवर्षीच स्टॉलच्या संख्येत वाढच होत असल्याचे दिसते.