शहरात आज विविध ठिकाणी रावण दहन Print

नागपूर / प्रतिनिधी
दसरानिमित्त शहरात कस्तुरंचद पार्क, चिटणीस पार्क, मेडिकल चौक, समर्थ नगरसह विदर्भातील विविध भागात २४ ऑक्टोबरला रावण दहनाच्या कार्यक्रमासोबत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम, रामलीला आणि फटाका शो आयोजित करण्यात आला आहे.  
सनातन धर्म सभा या संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कस्तुरचंद पार्क मैदानावर दसरा महोत्सव व रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात विविध रामकथावर आधारित नृत्यनाटिका, सांस्कृतिक कार्यक्रम व फटाक्याची आतषबाजी करण्यात येणार आहे. लाईट आणि साऊंड शोच्या माध्यमातून रामायणातील ‘अग्निपरीक्षा’ या विषयावर नाटिका सादर करण्यात येणार आहे.  गेल्या ६१ वर्षांपासून सनातन धर्म सभा संस्थेतर्फे रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून त्याला नागरिकांचा मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे प्रतिकात्मक पुतळे तयार करण्यात आले आहे. यावर्षी लाईट आणि साऊंडच्या माध्यमातून रामायणातील विविध प्रसंग सादर करणार असून त्यासाठी मुंबईच्या कलावंताना आमंत्रित करण्यात आले.
कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, खासदार विलास मुत्तेमवार, पालकमंत्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत, खासदार अजय संचेती, आमदार मितेश भांगडिया, महापौर अनिल सोले, राष्ट्रीय पंजाबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कपूर, विजय खेर, संजीव कपूर, उमेश शर्मा उपस्थित राहणार आहे. कस्तुरचंद पार्क मैदानावर सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे.
कस्तुरचंद पार्क मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमात विशेष आमंत्रित, आजीवन सदस्य व देणगीदारांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना येण्यासाठी चार प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहे. पासधारकांनाच आत प्रवेश दिला जाणार असून ज्या नागरिकांजवळ प्रवेशपत्र नाही अशा लोकांसाठी परिसरात वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी सनातन धर्म संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार असल्याचे खेर यांनी सांगितले. पार्कीगची व्यवस्था फुटबॉल मैदानावर करण्यात आली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे चिटणीस पार्कमध्ये रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावर्षी आगळ्या वेगळ्या फटाका शोचे आयोजित करण्यात आला आहे.
 गेल्या पाच वर्षांपासून चिटणीस पार्कमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जात असून परिसरातील नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. ५६ फूट रावणाची प्रतिमा तयार करण्यात आली असून त्याचे दहन करण्यात येणार आहे.
सायंकाळी ५.३० वाजता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी महापौर अनिल सोले, मालू पेपर मिल लि कंपनीचे अध्यक्ष दामोधर मालू, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रवीण दटके, विलास त्रिवेदी  बंटी कुकडे उपस्थित राहणार आहेत.
रावण दहनापूर्वी बडकस चौकातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक चिटणीस पार्क पोहचल्यावर त्या ठिकाणी शस्त्रपूजन आणि फटाका शो आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर रावणदहन होईल.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवराव उमगेडकर, नवीन गायकवाड, कमलेश नायक, प्रवीण धार्मिक यांच्यासह भाजयुमोचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
यशवंतराव चव्हाण सोशल फोरम व प्रभाग ५६ तर्फे पूर्व समर्थनगरातील महापालिकेच्या मैदानात रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संजीवनी चौधरी निर्मित रामलिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक, खासदार अजय संचेती, सागर मेघे, अशोक मानकर, सुनील रायसोनी, दिलीप पनकुले, मिकी अरोरा उपस्थित राहणार आहेत.