धम्मचक्र प्रवर्तन दिन, दसऱ्यानिमित्त नागपुरात होर्डिग्जचा सुळसुळाट Print

नागपूर / प्रतिनिधी
आगामी २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका बघता धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा फायदा घेत दीक्षाभूमी परिसरासह शहरातील विविध भागात मिळेल त्या जागी विविध राजकीय पक्षांची आणि नेत्यांची होर्डिग स्पर्धा रंगू लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात पोस्टर आणि होर्डिंगचा सुळसुळाट झाला असून अनेक राजकीय पक्षांनी दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहे.
धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिनानिमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून दीक्षाभूमीवर देशभरातून लााखोच्या संख्येत बौद्ध बांधव येतात. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी या पवित्र स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा घेतली होती. त्यामुळे या ऐतिहासिक दिनाचे महत्त्व आणि भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील श्रद्धेपोटी जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो बौद्ध बांधव आणि बौद्ध धम्मगुरू धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने श्रद्धेने दर्शन घेण्यासाठी येत असल्याच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांंपासून विविध राजकीय पक्षांनी शहरात जणू पोस्टरबाजी सुरू केली असून अनेक नेते आणि कार्यकर्ते शुभेच्छा देण्याच्या नावाखाली मोठमोठे होर्डिग लावून स्वतच्या प्रचाराची पोळी भाजून घेत आहते. दीक्षाभूमी परिसरात होर्डिग लावण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी पाच ते सहा महिने आधीच जागा ठरवून महापालिकेकडे अर्ज केले असल्यामुळे अनेकांनी त्या जागेवर दावे केले आहेत.
 रहाटे कॉलनी परिसरात बहुजन समाज पक्षासह विविध राजकीय पक्षांची मोठे होर्डिग्ज लावण्यात आली असून यावर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या छायाचित्रांची संख्या इतकी मोठी आहे की होर्डिग शुभेच्छांसाठी लावण्यात आले वा नेत्यांच्या छायाचित्रांसाठी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पक्षासह रिपब्लिकन पक्षातील विविध गटातील राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी जाहिरात आणि शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने दीक्षाभूमी परिसर होर्डिगने रंगविला आहे.
दीक्षाभूमी परिसरातील काही भागात होर्डीग लावण्याची महापालिकेची आणि स्मारक समितीची  परवानगी नसताना काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्या जागेवर होर्डिग्ज लावले असल्यामुळे आज सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यावर कारवाई केली. मात्र या कारवाई दरम्यान  काही वेळ त्या ठिकाणी वाद झाल्याची माहिती मिळाली मात्र, त्यांना लगेच त्याच परिसरात दुसऱ्या जागेवर परवानगी देण्यात आल्यामुळे वाद निवळला.
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपसह रिपब्लिकन पक्षातील वेगवेगळ्या गटाचे स्टॉल परिसरात दिसून येत आहे. महापालिकेच्या अनेक नगरसेवकांनी सुद्धा आपआपल्या नावाने शहरातील प्रवेशद्वार आणि होर्डीग लावले आहेत.
विविध राजकीय पक्षातर्फे शहरातील विविध भागात बौद्ध बांधवासाठी भोजनदान कार्यक्रम आयोजित केले असून अनेक बौद्ध बांधव त्याचा लाभ घेत आहे.