रा.स्व. संघाचा आज विजयादशमी उत्सव Print

नागपूर  / प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगराच्या तरुण स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उद्या, बुधवारी सकाळी साडेसात वाजता रेशीमबाग मैदानावर साजरा होणार आहे. या उत्सवाला आर्ष विज्ञान संस्थेचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे कार्यक्रमात प्रमुख भाषण होणार आहे.
याच कार्यक्रमात शस्त्रपूजनाचा कार्यक्रमही साजरा केला जाईल, तसेच स्वयंसेवक विविध शारीरिक प्रात्यक्षिके सादर करतील.
कार्यक्रमापूर्वी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी गणवेशधारी स्वयंसेवकांचे पथसंचलन रेशीमबाग मैदानातून सुरू होईल. रेशीमबाग चौक, केशवद्वार, गजानन चौक, आनंदनगर, दशपुत्र हॉस्पिटल, ओमनगर, विदर्भ बुनियादी हायस्कूल, सक्करदरा, पोलीस स्टेशन सक्करदरा चौक, रेशीमबाग पाण्याची टाकी मार्गाने हे संचलन कार्यक्रमस्थळी परत येईल.
नागरिकांनी पथसंचलनाचे मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करावे व कार्यक्रमाला  मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता व सहसंघचालक लक्ष्मण पार्डीकर यांनी केले आहे.
सर्व नागरिक आणि स्वयंसेवकांची वाहने ठेवण्याची व्यवस्था लोकांची शाळा,जामदार शाळा, सरस्वती मूकबधिर विद्यालय आणि नवभारत विद्यालय येथे करण्यात आली आहे.