महागाईतही खरेदीचा उत्साह बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी Print

नागपूर / प्रतिनिधी
alt

दिवसेंदिवस महागाई वाढत असली तरी बाजारपेठेत विजयादशमीच्या मुहूर्तावर विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. सोने व चांदीचे भाव वाढलेले असतानाही सराफा दुकानांमध्ये दागिने तसेच पेट्रोल व डिझेलचे दर वाढलेले असले तरी दुचाकी व चारचाकी वाहने खरेदीचा ग्राहकांचा उत्साह कायम आहे.
शहरात नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे. दसऱ्यानिमित्ताने बाजारपेठही सजली आहे. सणाचा लाभ घेण्यासाठी विविध कंपन्यांनी आणि त्यांच्या विक्रेत्यांनी उत्पादनांवर सूट तसेच काही आकर्षक योजना जाहीर केलेल्या असल्यामुळे ग्राहकांनीही वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. नवरात्रमध्ये अष्टमी, नवमीला शहरातील सीताबर्डी, महाल, इतवारी, सक्करदरा, धरमपेठ, प्रतापनगर यासह छोटय़ा बाजारपेठांमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी झुंबड केली. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूकही वाढत आहे. सोने ३१ हजार ४०० रुपये प्रतितोळा आणि चांदी प्रतिकिलो ६० हजार रुपयांपर्यंत पोहोचली असतानाही इतवारीच्या सराफा बाजारात दागिने खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे. एलसीडी, फ्रीज, सोफासेट, डायनिंग टेबल, फर्निचर यासह विविध गृहोपयोगी वस्तूंची ग्राहक मोठय़ा प्रमाणात खरेदी करीत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना ग्राहकांची चांगली मागणी आहे. ग्राहक शहारातील या बाजारपेठांसह मॉल्समधूनही मोठय़ा प्रमाणात वस्तूंची खरेदी करीत आहे.
 ग्राहक कुटुंबीयांसह नवरात्रीमध्ये उत्सवाचा आनंद घेत सायंकाळी देवीच्या दर्शनासोबतच काही किरकोळ वस्तूंचीही खरेदी करीत आहेत. ऑटोमोबाईल्सकडेही ग्राहकांचा वाढता कल आहे.
शहरातील वाहनांच्या शोरूम्स सजल्या आहेत. काही ग्राहक उद्या, विजयादशमीला दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी करणार आहेत.