डेंग्यूच्या प्रकोपाने नागपूरकर चिंतित Print

नागपूर / प्रतिनिधी
alt

शहारात जानेवारी २०१२ पासून डेंग्यूचा प्रकोप झाला असून उत्तर नागपुरातील टेका, नई बस्ती, पंचशीलनगर, वैशालीनगर, सिद्धार्थनगर, वरपाखड, नारा, नारी, इंदोरा झोपडा, हरिजन कॉलनी, लुम्बिनी नगर, मुकुंदनगर, गौतमनगर, पिवळी नदी, समतानगर अशा झोपडपट्टी वसाहतीतील अनेक नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे.
उत्तर नागपूर विकास परिषदेने महापालिकेचा आरोग्य विभाग या गंभीर आजाराची कल्पना असतानाही वस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला आहे. या भागातील खाजगी व शासकीय रुग्णालयात डेंग्यूग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. डेंग्यूमुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडल्याचा आरोप बॉबी दहिवले, रितेश बोरकर, इर्शाद मलिक यांनी केला आहे.
रोजगार हमी मंत्री डॉ. नितीन राऊत यांचेदेखील त्यांच्या उत्तर नागपूर मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचा विकास खुंटला आहे. तसेच संजय गांधी मैदानात २५० खाटांचे शासकीय रुग्णालय असूनही या रुग्णालयात कुठल्याच प्रकारची सोय नाही, असे उत्तर नागपूर विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
यासंदर्भात परिषदेने महापालिकेशी पत्रव्यवहार केला असून डेंग्यूमुळे लहान मुलांचे मृत्यू वाढल्याचे बाब स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आणून दिले आहे. एक जानेवारी ते २५ सप्टेंबर यादरम्यान महापालिकेने मेयोतील पॅथॉलॉजी लॅब मध्ये ४२ रुग्णांचे नमुने पाठवले. त्यातील २७ रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला. त्यातील सात रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
२४, २५ आणि २६ सप्टेंबर या तीन दिवशी महापालिकेच्या आरोग्य विभागाने १५ संदिग्ध रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
उत्तर नागपुरातील स्वच्छतेचा अभाव आणि मलेरिया विभागाच्या फव्वारणी विभागाच्या निष्क्रियतेमुळे निष्पाप मुलांचा बळी जात असल्याचा आरोप संयोजक वेदप्रकाश आर्य यांनी केला.