धम्मचक्र प्रवर्तन दिन आज दीक्षाभूमीवर भव्य सोहळा Print

नागपूर / प्रतिनिधी ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
alt

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाची तयारी जोमात सुरू असून बौद्ध बांधवांचे येणे सुरू झाले आहे. उद्या, बुधवारी सायंकाळी ६ वाजता धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम दीक्षाभूमीच्या प्रांगणात होणार आहे. केरळचे माजी राज्यपाल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष रा.सु. गवई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला पालकमंत्री शिवाजीराव मोघे, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितीन राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, वित्त व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक, महापौर अनिल सोले, खासदार विलास मुत्तेमवार, दत्ता मेघे आणि विजय दर्डा यांच्यासह देशविदेशातील धम्मगुरू उपस्थित राहतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी या पवित्र भूमीवर महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली होती. त्या प्रसंगाची स्मृती म्हणून उद्या सकाळी ८ वाजता नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थिीत सामूहिक बुद्धवंदना होईल. बौद्ध बांधवांसाठी दीक्षाभूमी सज्ज झाली असून परिसरात बौद्ध बांधवाचे येणे सुरू झाले असून परिसरात त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेयो हॉस्पिटल, महापालिका आरोग्य विभागातर्फे बौद्ध बाधवांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यावर्षी दीक्षाभूमी परिसरात पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. परिसरात सीसी टीव्ही लावण्यात आले आहेत. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी स्मारक समिती आणि पोलीस विभाग सदैव तत्पर राहणार आहे. स्मारकाच्या आजूबाजूला चांगला प्रकाश राहील, अशी प्रकारची विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षी दीक्षाभूमीवर बौद्ध बांधवांची संख्या वाढत आहे. यावर्षी सुद्धा मोठय़ा प्रमाणात बौद्ध बांधव येण्याची शक्यता आहे. या धम्मदीक्षा सोहळ्यासाठी महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास, पोलीस विभाग, एसटी महामंडळ यंत्रणा कामाला लागली आहे. दीक्षाभूमीवरून कामठीतील ड्रॅगेन पॅलेसपर्यंत स्टार बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्यामुळे अनेक बौद्ध बांधव त्याचा लाभ घेत आहेत.