पोहरेंची पोलीस कोठडी एक दिवसाने वाढविली Print

नागपूर / खास प्रतिनिधी
दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक व मालक प्रकाश पोहरे यांची पोलीस कोठडी कळमेश्वर न्यायालयाने गुरुवारी एक दिवसाने वाढवून दिली. दरम्यान, पोहरे यांना न्यायालयात आणताच महिलांच्या एका गटाने त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
प्रकाश पोहरे यांना मंगळवारी पहाटे अकोल्याजवळील त्यांच्या फार्म हाऊसमधून ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांना त्याच दिवशी कळमेश्वर येथे आणून न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आज प्रकाश पोहरे यांना कळमेश्वर पोलिसांनी न्यायालयात आणले. पोहरे यांच्या हाताला पट्टी बांधलेली होती. आरोपी प्रकाश पोहरे तसेच याआधी अटक केलेला सुरक्षा जवान द्विवेदी हे तपासात सहकार्य करीत नसल्याचे सरकार पक्षाने न्यायालयात सांगितले. ‘देशोन्नती’ कामगारांची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी आरोपींनी कट रचला असल्याचा आरोप केला.
द्विवेदी हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून त्याचा बंदूक परवाना पश्चिम बंगालचा आहे. परप्रांतातील परवाना असला तरी तो नागपुरात असल्याने स्थानिक यंत्रणेकडे बंदूक तसेच परवाना याची माहिती नोंदवायला हवी. तशी ती त्याने केलेली नाही. आरोपींकडून तपासा करण्यासाठी आरोपीला ३१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकार पक्षाने केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी यास हरकत घेतली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने आरोपी प्रकाश पोहरे यांची पोलीस कोठडी एक दिवस वाढवून दिली. आरोपींची बाजू अ‍ॅड. अन्सारी यांनी मांडली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सोहेल अहमद, ‘देशोन्नती’च्या कामगारांतर्फे अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल तसेच रूपेश जयस्वाल यांनी काम पाहिले.