चोऱ्या आणि लुटमारीचे सत्र सुरूच Print

उपराजधानी असुरक्षित
 नागपूर / खास प्रतिनिधी
दाराचा कडी-कोयंडा तोडून चोरटय़ांनी ५४ हजाराचा ऐवज चोरून नेला. भेंडे लेआऊटमधील दत्तनगरात मंगळवारी सायंकाळी ही चोरी झाली. घरफोडय़ा-चोऱ्यांचे सत्र थांबता थांबत नसून यामुळे नागरिकांसह पोलीसही हैराण झाली आहेत.
मनीष जयप्रकाश बोधनकर हे घराला कुलूप लावून सायंकाळी कुटुंबासह देवदर्शनाला प्रतापनगरात गेले होते. रात्री ते घरी परत आल्यानंतर मुख्य दाराचा कडी-कोंडा तुटलेला दिसला. घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लाकडी कपाटातील कॅमेरा, सोन्याचे दागिने, पासपोर्ट, चेक असा एकूण ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
चोरीची दुसरी घटना झिंगाबाई टाकळी परिसरातील डोळे लेआऊटमध्ये घडली. राममोहन अचरजलाल चंडाळे हे कुटुंबासह घराला कुलूप लावून २० तारखेला दुपारी पावणेपाच वाजताच्या सुमारास आईच्या अंत्यसंस्कारासाठी छिंदवाडा येथे गेले होते. बुधवारी सकाळी ते परत आले. दाराचा कडी-कोंडा त्यांना तुटलेला दिसला. शयनकक्षातील लाकडी व लोखंडी कपाटांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख सत्तर हजार, असा एकुण १ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचती तक्रार त्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला.  
चोरीची तिसरी घटना दक्षिण नागपुरातील अंबानगरात बुधवारी विजयादशमीला दिवसाढवळ्या घडली. संजय हिरामण पेठकर हे सकाळी अकरा वाजताच्या सुमारास कुटुंबासह घराला कुलूप लावून कामठीला विजयादशमीसाठी नातेवाईकांकडे गेले होते. रात्री दहा वाजता घरी परत आले असता दाराचा कुलूप-कोंडा तुटलेला दिसला. शयनकक्षामधील आलमारीतील सोन्याचे दागिने व रोख बारा हजार, असा एकूण ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
दोन महिलांना ढकलून त्यांचे दागिने लुटल्याची घटना कळमना आदिवासीनगराजवळ बुधवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घडली. तिरंजा रमेश तुरकर (रा. मारवाडीवाडी) या त्यांच्या वहिनीसह नातेवाईकाकडे जेवणासाठी दुचाकीने गेल्या होत्या. परत येतांना चिखली पुलाजवळ पेट्रोल संपल्याने त्या पायच निघाल्या. रेल्वे फाटकाजवळून जात असताना मागून पायी आलेल्या दोघांनी त्या दोघींनी जमिनीवर ढकलले. त्या दोघींच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र, गळसोडी व रोख दोन हजार, असा एकूण ३८ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून पळून गेले. कळमना पोलिसांनी गुन्हा  नोंदवला.  एका सायकलस्वारास वस्तऱ्याने जखमी करून लुटल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास तुलशीनगरात घडली. रिकेश गयाप्रसाद शाहू (रा. शाहू मोहल्ला) हा सायकलने जात होता. मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्याला ठोस मारून खाली पाडले. वस्तऱ्याने जखमी करून खिशातील सोळाशे रुपये हिसकावून पळून गेले. लकडगंज पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला.