गोसीखुर्दच्या लाचखोर अधीक्षक अभियंत्याचे अद्यापही निलंबन नाही Print

नागपूर / खास प्रतिनिधी
लाच घेताना रंगेहाथ सापडलेला गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाचा अधीक्षक अभियंता मदन मते याच्या निलंबनाचे आदेश दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही अद्याप आलेले नाहीत. गोसीखुर्द उपसा सिंचन सर्कल (अंबादी) येथे नोकरीवर असलेल्या मदन मतेला ५० हजार रुपयांची लाच घेतना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली होती. एका निविदेला अनुमती देण्यासाठी मदन मतेने लाचेची मागणी केल्याने त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर त्याला सापळा रचून पकडण्यात आले होते. मात्र, वरिष्ठांनी त्याच्या निलंबनाचे आदेश अजूनपर्यंत जारी केलेले नाहीत.
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार कोणताही सरकारी अधिकारी जर लाच घेताना रंगेहाथ सापडला असेल आणि त्याला ४८ तासाची पोलीस कोठडी मिळाली असेल तर त्याची एकतर बदली केली जाते किंवा त्याला निलंबित केले जाते. लाचप्रकरणात अडकलेला मदन मते ४८ तास पोलीस कोठडीत होता.
मतेला जामीन मंजूर झाल्यानंतर एसीबीने मंत्रालयात सिंचन खात्याला पत्र लिहून त्याच्या निलंबनाची मागणी केली आहे. परंतु, अद्यापही निलंबनाचे आदेश आलेले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.
एसीबीच्या एका पथकाने मदन मतेच्या प्रतापनगरातील निवासस्थानी छापा घालून २.२८ लाख रुपये तसेच त्याची आई अनसूयाबाई मते याच्या नावावर केलेले ३२ लाख रुपयांचे सेव्हिंग्ज सर्टिफिकेट्स जप्त केले. त्याच्या आईच्या नावे मोठी शेतीदेखील आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मदन मतेची बँक लॉकर्स तपासण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्या तरी मतेने त्यासाठी मुदत मागितल्याचे समजते. त्यामुळे त्याच्या बँक लॉकर्सची माहिती उजेडात येऊ शकलेली नाही.