धम्मबांधवांचा ओघ सतत वाढतोय.. Print

नागपूर / प्रतिनिधी
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणारी अलोट गर्दी दरवर्षी वाढतच चालली आहे. दीक्षाभूमीवर होणाऱ्या बांधकामांमुळे आतील जागा जसजशी आकुंचन पावत आहे तसतसे दसऱ्याच्या आदल्या दिवसापासून लोक रस्त्यांवर येऊन ठाण मांडत आहेत. त्यानंतर भोजनदान आणि इतर स्टॉल उभारलेले दिसून येत असल्याचे चित्र आहे. दीक्षाभूमीच्या चारही बाजूंना वाहत्या गर्दीमुळे सर्व रस्ते बंद केले जातात. हल्ली १४ ऑक्टोबर आणि दसरा अशा दोन भागात दीक्षाभूमीवरील गर्दी विभागली गेली आहे. बुधवारी २४ ऑक्टोबरचा दसरा असताना २० ऑक्टोबरपासूनच दीक्षाभूमीवर लोकांचे येणे सुरू होते. दीक्षाभूमीवर विसावा घेण्यासाठी जसे लोक येतात त्या बरोबरच ड्रॅगन पॅलेस, नागभूमी, बुद्धभूमी, चिचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय एवढेच नव्हे तर अंबाझरी गार्डन, महाराजबाग याठिकाणीही गर्दी विखुरलेली असते. डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला केलेल्या धम्मचक्र प्रवर्तनानंतर ही गर्दी वाढत चालली आहे. एवढी की हल्ली थायलंड, चीन, जापानचे धर्मगुरूही या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने हजेरी लावत आहेत. ही गर्दी केवळ स्तुपावर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठीच येत नाही तर त्यांचे सर्व प्रकारचे साहित्य मिळण्याचे  मिळण्याचे हे एकमेव ठिकाण आहे. भारतभरातील हिंदी, इंग्रजी आणि मराठीतील प्रकाशक याठिकाणी येतात. त्यामुळेच पुस्तकांच्या रूपाने कोटय़वधींची उलाढाल याठिकाणी होत असल्याचे पुस्तक विक्रेत्या वंदना जीवने यांचे म्हणणे आहे.
पुस्तकांपाठोपाठ इतर आर्थिक उपक्रम आणि सर्जनशीलतेलाही दीक्षाभूमीवर मोठा वाव मिळतो आहे. त्यात डॉ. आंबेडकर, भगवान बुद्धांच्या मूर्ती, छायाचित्र, कॅसेट्स, सीडींचीही विक्री भक्कम होते. दोनशेच्या घरात गेलेल्या स्टॉलव्यतिरिक्त रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि रस्ता दुभाजकावर बसणाऱ्या विक्रेत्यांची त्यात गिणती नाहीच. गेल्या ५६ वर्षांपासून दीक्षाभूमीवर कार्यक्रम भरवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या कार्यक्रमाचे नियोजन अद्यापही ढिसाळ आहे. गरीब, उपेक्षित लोक येतात, हल्ली नेत्यांची भाषणे न ऐकता बाबासाहेबांच्या अस्थिंना वंदन करतात आणि जातात. त्यामुळे या धावत्या गर्दीचे मोजमाप फारसे होत नाही. दलितांमधील सर्जनशीलतेला उजागर करणारे दीक्षाभूमी महत्त्वाचे स्थान आहे. यावेळी पाच लाख वर्षांपूर्वीच्या मानवी कवटय़ांचे प्रदर्शन ब्रेन पोलिओ रिसर्च अ‍ॅन्ड इरॅडिकेशन सेंटरतर्फे भरवण्यात आले होते. त्यासाठी मानवी कवटींचे ‘नर्मदा मॅन’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सुमारे ३० वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातील सिहोर जिल्ह्य़ात नर्मदेच्या किनारी भारतीय भू-वैज्ञानिक विभागाचे डॉ. अरुण सोनकिया यांनी या कवटय़ांचा शोध लावला होता.
नैसर्गिक रूपात ठेवण्यात आलेल्या या कवटय़ांना आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त आहेत. भारतीय समाजातील अंधश्रद्धा आणि कुप्रथांच्य निर्मूलनासाठी ब्रेन पोलिओ रिसर्च सेंटरने कित्येक राज्यात अशाप्रकारचे प्रदर्शन आयोजित केले आहे. धम्मप्रवर्तन दिनानिमित्त ‘चला धम्म जगु या’ या पथनाटय़ाचे चे ५६ प्रयोग दीक्षाभूमी परिसर आणि रस्त्यावर नाटककार संजय जीवने आणि त्यांच्या १०० कलावंतांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धावरील अनेक नाटके व महानाटय़ांची निर्मिती संजय जीवने आणि वंदना जीवने या दाम्प्त्याने केली आहे. दीक्षाभूमीवर होणारी गर्दी हेरून एकीकडे पुस्तक विक्रीचा स्टॉल आणि दुसरीकडे कलेची उपासना करीत बुद्ध तत्त्वज्ञान सांगण्याचे काम जीवने कुटुंबीय गेली अनेक वर्षे हिरीरीने करीत आहेत.