नासुप्रच्या अमृत महोत्सवानिमित्त रंगारंग कार्यक्रम Print

* हेमामालिनीची उपस्थिती
* साईबाबांवरील महानाटय़ आकर्षण
नागपूर / प्रतिनिधी
नागपूर सुधार प्रन्यासला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येत्या २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान तीन दिवसाचा रंगारंग सांस्कृतिक महोत्सव कस्तुरचंद पार्क मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नृत्यनाटिकेसह मराठी तारका आणि स्थानिक कलावंत निर्मित ‘शिरडी के साईबाबा’ महानाटय़ सादर होणार असल्याची माहिती सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे यांनी दिली.
नागपूर सुधार प्रन्यासच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या महोत्सवात २८ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता अभिनेत्री हेमा मालिनी यांचा महाभारतावर आधारित ‘धृपद नृत्यनाटिका’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या समारंभाला पालकमंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, ‘रोहयो’मंत्री नितीन राऊत, महापौर अनिल सोले यांच्यासह विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. २९ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता महेश केळकर दिग्दर्शित मराठी तारकांचा रंगारंग कार्यक्रम सादर होणार आहे. अभिनेत्री क्रांती रेडकर, नेंहा पेंडसे, रेशम टिपणीस, स्मिता तांबे, प्रिया बापट, किशोरी गोडबोले, स्मिता शेवाळे, नूतन जयंत, सिया पाटील, स्मिता गवाणकर, अमृता खानविलकर, गौरी खानविलकर, नेहा घाडगे, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, आदिती भागवत, रागिणी भागवत, मृण्मयी देशपांडे या मराठी तारकांशिवाय उमेश कामत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मराठी तारकांचा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत असून नागपुरात या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास दराडे यांनी व्यक्त केला. येत्या ३० ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता संस्कार मल्टिसव्‍‌र्हिसेसच्या आसावरी तिडके निर्मित आणि डॉ. नरेश गडेकर दिग्दर्शित ‘शिरडी के साईबाबा’ या महानाटय़ाचा प्रयोग सादर होणार आहे. हे कार्यक्रम रसिकांसाठी निशुल्क ठेवण्यात आले असले तरी झोन कार्यालयातून प्रवेशपत्र देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला विश्वस्त अनंतराव घारड, आमदार दीनानाथ पडोळे आणि किशोर कन्हेरे उपस्थित होते.      

कार्यक्रमांचा खर्च प्रायोजकांचा..
सांस्कृतिक कार्यक्रमाचा खर्च करण्याची जबाबदारी नागपूर सुधार प्रन्यासने प्रायोजकांकडे दिली आहे. जनमंचने माहितीच्या अधिकारात माहिती घेऊन महोत्सवावर नागपूर सुधार प्रन्यास ३ कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली होती. मात्र अमृत महोत्सवासाठी तरतूद केलेले ३ कोटी रुपये सांस्कृतिक कार्यक्रमांवर नाही तर विविध समाजपयोगी उपक्रमांवर आणि क्रीडासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे दराडे यांनी स्पष्ट केले. सेंटर पॉईंट, सन अ‍ॅण्ड सन, बाबा ट्रॅव्हल्स यांच्याशिवाय खाजगी संस्थांनी प्रायोजकत्व स्वीकारले आहे. शहराच्या विकासासाठी काम केलेले आणि वेगवगेळ्या क्षेत्रात नागपूरचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविणाऱ्यांचा नागपूर सुधार प्रन्यासतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्याने तयार करण्यात येणार आहेत. दीड लाख वृक्ष लागवड करण्याची मोहीम २०१४ पर्यंत राबविली जाणार आहे. शहरातील ७५ उद्याने विकसित केल्यानंतर त्या उद्यानांची जबाबदारी महापालिकडेकडे देणार असल्याचे दराडे यांनी सांगितले.