आरोपांची राळ झटकून गडकरी दसऱ्याच्या दिवशी पूर्णवेळ ‘बिझी’ Print

नागपूर/ प्रतिनिधी
इंडिया अगेन्स्ट करप्शनने आरोपांची पहिली तोफ डागल्यानंतर अस्वस्थ झालेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी दसऱ्याच्या दिवशी दोन मोठय़ा कार्यक्रमात नागपुरात पूर्णवेळ व्यस्त दिसून आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशमीबाग मैदानावरील विजयादशमी सोहळ्याला गडकरींनी संघ स्वयंसेवकाच्या गणवेशात हजेरी लावली. त्याच दिवशी रात्री दीक्षाभूमीवर झालेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातही गडकरी व्यासपीठावर दिसले. नागपुरात असताना गडकरींनी त्यांच्याविरुद्धच्या आरोपांना कोणतेही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला नाही.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर गडकरींची ‘मिडिया ट्रायल’ सुरूअसून आरोपांची राळ उडविली जात आहे. गडकरींच्या पाठिशी संघ अद्यापही ठामपणे उभा असल्याचे चित्र सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि संघाचे प्रसार प्रमुख मनमोहन वैद्य यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले. भागवत यांनी हा भाजपचा अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगितले तर गडकरींवर ही ‘मिडिया ट्रायल’ असून त्याचा काय फैसला होतो, ते पाहू या अशी सारवासारव मनमोहन वैद्य यांनी केली. दसऱ्याचा दिवस गडकरींच्या दृष्टीने अत्यंत व्यस्त ठरला. महत्त्वाच्या सणांना गडकरींची वाडय़ावर हजेरी ठरलेली असते. त्यामुळे दसऱ्याला त्यांना सोने देण्यासाठी वाडय़ावर मोठी रीघ लागली होती. आरोपांमुळे गडकरी कुठेही विचलित झाल्याचे चित्र नव्हते. त्यांचा नित्यक्रम नेहमीप्रमाणे होता.  सकाळी संघाच्या विजयादशमी सोहळ्यात पूर्ण संघ गणवेशात असलेल्या गडकरींचे मिडियाकडून भरपूर फोटोसेशन झाले. गडकरींबरोबर आमदार देवेंद्र फडणवीसदेखील गणवेशात हजर होते. भेटायला येणाऱ्यांशी गडकरींचा हास्यविनोद सुरू होता. संध्याकाळी दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यातही गडकरींनी हजेरी लावून घणाघाती भाषण केले. त्यांच्यावरील आरोपांचा यात कुठे लवलेशही नव्हता. चार दिवसांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी नागपुरातील संघ मुख्यालयात येऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी साडेतीन तास चर्चा करून प्रसिद्धी माध्यमांशी मोजकेच शब्द बोलून तडकाफडकी गुजरातला रवाना झाले होते.  गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्याची आशा ठेवून असलेले नरेंद्र मोदी सध्या अंतर्गत विरोधाचा सामना करत आहेत. यात बंडखोर नेते केशुभाई पटेल आणि संजय जोशी यांचे समर्थक त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरले आहेत. मोदींची सरसंघचालकांसमवेतची चर्चा गडकरींविरोधातील होती, अशी एक माहिती समोर आली आहे. ज्या दिवशी मोदी नागपुरात होते त्यादिवशी गडकरी नेमके नागपूरबाहेर होते. हीच संधी मोदींनी साधल्याची चर्चा आहे. गडकरींच्या बचावासाठी लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, मुख्तार अब्बास नकवी या नेत्यांनी
धावाधाव केली असली तरी मोदींनी अद्याप गडकरींच्या समर्थनार्थ चकार शब्दही उच्चारलेला नाही. तर राज्यसभा सदस्य राम जेठमलानी यांनी गडकरींनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करून पक्षात खळबळ
उडवून दिली आहे.