धम्मचक्र प्रवर्तन सोहळा उत्साहात Print

दीक्षाभूमीवर लाखो धम्मबांधवांची महामानवाला वंदना
नागपूर/ प्रतिनिधी

डॉ.  बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीला लागणाऱ्या दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव नागपूर सुधार प्रन्यासने लवकर शासनाकडे पाठवावा, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले. ५६व्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. घरकूल योजनेचे ‘रमाई’असे नामकरण केले असून एक लाख घरे बांधून झाली आहेत तर उर्वरित दोन लाख घरे गोरगरिबांसाठी बांधून द्यायची आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष व केरळचे माजी राज्यपाल रा.सू. गवई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  नितीन गडकरी, भदंत सुरेई ससाई उमरखेडचे आमदार विजय खडसे, चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे, महापौर अनिल सोले, कमलताई गवई, रेखा मोघे, उपमहापौर संदीप जाधव आणि विभागीय आयुक्त डॉ.व्ही.बी. गोपालरेड्डी इत्यादी उपस्थित होते.
मोघे म्हणाले, प्रकांडपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर लाखो पुस्तके शेकडो भाषांतून निघाली. मात्र बाबासाहेब लिखित भारतीय राज्यघटनेला सर्वमान्यता मिळाली. संपूर्ण देशावर कधीही लष्करी शासन हुकूमत गाजवू शकले नाही. ही राज्यघटनेची देण आहे. डॉ. आंबेडकरांचे निष्ठावंत कार्यकर्ते दिवं. वामनराव गोडबोले यांनी बाबासाहेबांच्या अनेक वस्तू संग्रही ठेवल्या. त्या वस्तूंचे जतन करण्यासाठी वर्धा मार्गावरील चिंचोली येथे संग्रहालय उभे करण्यात येत आहे. या संग्रहालयाला ४० कोटी रुपये दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाले असून जागेचा वादही मिटला आहे. तसेच बांधकामाची निविदाही काढण्यात आली आहे. स्मारक समितीला लागणाऱ्या दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव नागपूर सुधार प्रन्यासने शासनाकडे पाठवावा, असे आवाहन करून गवई यांच्या सूचनेचा त्यांनी मान राखला.
नितीन गडकरी म्हणाले, रा.सू. गवई हे दोनदा राज्यपाल झाले असले तरी दीक्षाभूमीवरील त्यांनी उभारलेले स्मारक ही त्यांची ऐतिहासिक कामगिरी आहे. नुकतेच मी उद्योगात असलेल्या दलित बांधवांच्या संघटनेच्या उद्घाटन कार्यक्रमात गेलो. त्यातील श्रीमती  सरोज या दलित महिला उद्योगपतीने मुंबईतील बंद पडलेली कमानी उद्योगसमुहाची सुत्रे हाती घेऊन कंपनीची भरभराट करून एक हजार कोटींवर  उलाढाल पोहोचवली आहे. अशा अनेक नामंवत दलित उद्योगपतींशी त्या कार्यक्रमात भेट झाली असून बाबासाहेबांमुळेच आजचा दलित माणूस त्याच्या हक्कांसाठी जागृत झालेला दिसून येतो.  
अध्यक्षीय भाषणात रा.सू. गवई यांनी ‘भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना.. आणि ‘तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी..’ या सुरेश भटांच्या दोन गीतांच्या रेकॉर्डिग संबंधीची आठवणी सांगितल्या. माणसामाणसातील संबंध वस्तुनिष्ट तत्त्वज्ञानावर आधारित   असल्याचे   मार्गदर्शन  करणारा बौद्ध धम्म  बाबासाहेबांनी समस्त जनतेला दिला. आजही तक्षशीला आणि नालंदा या विद्यापीठांमध्ये लोकशाहीचे अवशेष मिळतात, असेही ते म्हणाले.
महापौर अनिल सोले यांनी स्थानिक प्रशासनचे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तचे योगदान अधोरेखित केले.
प्रास्ताविक समितीचे सरचिटणीस सदानंद फुलझेले यांनी केले.
संचालन डॉ. सुनील रामटेके यांनी केले. सुमारे सहा लाख बौद्ध बांधवांनी दीक्षाभूमीला भेट दिली.