संघाने आळवला रामजन्मभूमीचा राग! Print

नागपूर/ प्रतिनिधी, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२

विजयादशमी उत्सवाच्या गेल्या काही भाषणांमध्ये नसलेल्या राममंदिराच्या मुद्याचा यावेळी उल्लेख करताना सरसंघचालकांनी रामजन्भूमी न्यासला भव्य मंदिर बांधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. घुसखोरीच्या समस्येवर वेळीच उपाययोजना न केल्यास ईशान्य भारताची स्थितीही काश्मीरसारखी होऊ शकते असा इशारा देतानाच, किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात एफडीआयला परवानगी देण्याच्या धोरणावर त्यांनी टीका केली.
रा.स्व. संघाच्या नागपूर महानगराचा विजयादशमी उत्सव बुधवारी रेशीमबाग मैदानावर झाला. याप्रसंगी प्रमुख भाषण करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलत होते. आर्ष विज्ञान संस्थेचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर परिसराजवळ बरीच मोठी जमीन ताब्यात घेऊन तिथे मुसलमानांकरता काहीतरी मोठे बांधकाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगून सरसंघचालक म्हणाले, की राममंदिर बांधण्याचे प्रकरण न्यायालयात असताना अशा कारवायांमुळे सांप्रदायिर्क सौहार्दाचे नुकसानच होईल. या ठिकाणी राममंदिर बांधण्याबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर भांडण कायम ठेवायला नको. या मुद्यावर न्यायालयाचा निर्णय स्पष्ट असून, मंदिर बांधण्यासाठी सर्वानी सहकार्य केल्यास हा वाद कायमचा संपून जाईल. मात्र आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मतपेढीवर लक्ष ठेवून हे षडयंत्र रचण्यात येत आहे. कायदा करून रामजन्मभूमी न्यासाला भव्य राममंदिर बांधण्याची परवानगी द्यावी आणि मुस्लिमांसाठी जे बांधकाम करायचे ते अयोध्येच्या सांस्कृतिक सीमेबाहेरच करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
देशासमोरील अंतर्गत आणि बाह्य़ आव्हानांचा सामना करण्यासाठी पुरेशी उपोययजना होत नसल्याबद्दल डॉ. भागवत यांनी खंत व्यक्त केली.  सीमेच्या संरक्षणाबाबत ढिसाळपणा दाखवला जातो. आपल्या हद्दीत येणाऱ्या बेटांसह देशाच्या सीमांचे प्राधान्याने संरक्षण करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. देशातील तरुणही पैसा मिळवून देणाऱ्या व्यवसायांचाच करियर म्हणून विचार करतात, मात्र सैन्यात अधिकारी होण्याबाबत ते उदासीन आहेत अशी व्यथाही भागवत यांनी बोलून दाखवली. जम्मू- काश्मीरमध्ये गेल्या १० वर्षांत सरकारने राबवलेल्या धोरणामुळे तेथील कट्टरपंथी कारवाया पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसत असल्याचा इशारा मोहन भागवत यांनी दिला.
बहुराष्ट्रीय कंपन्यांनी किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात प्रवेश करण्याचा जगात कुठेही चांगला अनुभव नसताना भारतात त्यासाठी परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयावर मोहन भागवत यांनी टीका केली. राष्ट्रीय चारित्र्य व संस्कारांच्या अभावामुळे भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची न संपणारी मालिका सुरू झाली आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी लहानमोठी आंदोलने होत असून संघाचे अनेक स्वयंसेवकही त्यांत सहभागी होत आहेत. मात्र माध्यमे चांगले लोक आणि चांगली कामे यांना प्रसिद्धी देत नाहीत, असा टोला भागवत यांनी लगावला.
भारतात आसेतुहिमाचल संस्कृती सारखी असून सर्वाचा ‘रिलिजन’ सारखा आहे. भारत म्हणजे केवळ भौगोलिक क्षेत्र नव्हे, तर येथील चालीरीती, संस्कृती, जीवनपद्धती आणि लोकांचा दृष्टिकोन म्हणजे देश आहे. भारतातील लोक मिळून भारत बनतो. देशातील प्रथा-परंपरा, जीवनपद्धती आणि जीवनशैलीचे प्रकार हा देशाच्या समाजजीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, असे प्रतिपादन स्वामी दयानंद सरस्वती यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघ स्वयंसेवकांनी विविध शारीरिक कवायती सादर केल्या.  नागपूर महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता यांनी प्रास्ताविकासह पाहुण्यांचा परिचय करून
दिला. वरील वक्तयांशिवाय विदर्भ प्रांत
सहसंघचालक राम हरकरे व नागपूर महानगर सहसंघचालक लक्ष्मण पार्डीकर हेही व्यासपीठावर उपस्थित होते.    

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे पूर्ण गणवेषात या कार्यक्रमात हजर होते. ‘पूर्ती’ प्रकरणात दिग्विजयसिंग यांनी त्यांच्यावर केलेले आरोप आणि कंपनी व्यवहार मंत्री वीरप्पा मोईली यांनी या आरोपांच्या चौकशीची दाखवलेली तयारी यामुळे पुन्हा प्रकाशझोतात आलेल्या गडकरी यांच्याशी बोलण्याचा देशभरातून आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु गडकरी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. गडकरी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे संघ विचलित झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्याने या मुद्यावर संघाची प्रतिक्रिया मिळावी अशी प्रसारमाध्यमांची इच्छा होती. परंतु सरसंघचालक मोहन भागवत यांनीही पत्रकारांशी बोलणे टाळले. गडकरी यांच्याबाबत होत असलेले आरोप म्हणजे ‘मीडिया ट्रायल’ असून, त्यांना स्वत:वरील आरोपांबाबत उत्तर देण्याची संधी मिळाली पाहिजे, असे मत संघाचे प्रसारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले.