महेश एलकुंचवार यांना उद्या भालेराव स्मृती पुरस्कार Print

नागपूर / प्रतिनिधी
यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांना रविवारी, औरंगाबादेतील तापडिया नाटय़मंदिरात आयोजित कार्यक्रमात समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार असून याप्रसंगी ‘नाटकाचे व्याकरण’ या विषयावर एलकुंचवार यांचे व्याख्यान होणार आहे. मराठवाडय़ातील ज्येष्ठ पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक अनंत भालेराव यांच्या स्मृत्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पत्रकारिता, सामाजिक सेवा व कलासंस्कृती या क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. २५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी मंगेश पाडगावकर, निळू फुले, अप्पा जळगावकर, वसंत पळशीकर, मृणाल गोरे, ना. धों. महानोर, अरुण टिकेकर, कुमार केतकर, डॉ. अभय बंग, डॉ. शशिकांत अहंकारी आदींना हा बहुमान लाभला आहे. कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अनंत भालेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकरराव मुळे व सचिव डॉ. सविता पानट यांनी केले आहे.