प्रकाश पोहरेंची रवानगी मध्यवर्ती कारागृहात Print

नागपूर / प्रतिनिधी
दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक व मालक प्रकाश पोहरे यांची गुरुवारी एक दिवसांनी पोलीस कोठडी वाढविल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडीचे आदेश दिल्यानंतर त्यांची रवानगी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. 
प्रकाश पोहरे यांना मंगळवारी पहाटे अकोल्याजवळील त्यांच्या फार्म हाऊसमधून ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांना त्याच दिवशी कळमेश्वर येथे आणून न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर गुरुवारी पोहरे यांना पुन्हा एकदा कळमेश्वर पोलिसांनी न्यायालयात हजर केले.
आरोपी सुरक्षा कर्मचारी हरिकृष्ण द्विवेदी यांच्याकडे असलेल्या बंदुकीचा परवाना पश्चिम बंगाल असून त्याचा तपास करावयाचा असल्यामुळे एक दिवसांनी पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाला केली त्यामुळे त्यांची एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली होती.
आज सकाळी त्यांना कळमेश्वर न्यायालयाला सुटी असल्याने सावनेर न्यायालयात आणण्यात आले. सरकारने त्यांची चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे मध्यवर्ती कारागृहात त्यांची रवानगी करण्यात       आली. आरोपींची बाजू अ‍ॅड. अन्सारी यांनी मांडली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सोहेल अहमद, ‘देशोन्नती’च्या कामगारांतर्फे अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल तसेच रूपेश जयस्वाल यांनी काम पाहिले.