बारावीच्या तीन विद्यार्थ्यांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू Print

नागपूर / प्रतिनिधी
विजयादशमीनमित्त सहलीला गेल्यानंतर पोहण्याचा आनंद लुटण्सासाठी उतरलेल्या तीन युवकांचा बुडुन मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह गुरुवारी रात्री तर उर्वरित दोघांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी गोडेघाट नदीच्या पात्रात तरंगताना आढळले. कामठी हद्दीत कन्हान गाडेघाट नदीच्या पात्रात ही दुर्दैवी घटना घडली.
राहूल नागोराव मांडवे, प्रवीण निळकंठ पाटील, अंकुश कन्हैयलाल चौरीकर अशी तिघांची नावे असून ते इयत्ता बारावीचे विज्ञानाचे विद्यार्थी होते.
विजयादशमीला महाविद्यालयाला सुटी असल्याने शहराच्या बाहेर कुठेतरी जावे या उद्देशाने देशपांडे ले आऊट परिसरात राहणारा राहुल नागेराव मांडवे (१८), हिवरीनगरातील प्रवीण निळकंठराव पाटील (१९) आणि चारपारी नगरातील अंकुश कन्हैयालाल चौरीकर (१८) या तिघांसहीत अन्य त्यांचे तीन मित्र २४ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता कन्हान परिसरात सहलीसाठी गेले. तेथून ते कामठीला ड्रॅगेन पॅलेसमध्ये जाणार होते. मात्र तिथे जाण्यापूर्वी कामठीपासूनच जवळच असलेल्या गाडेघाट नदीवर त्या सहा मित्रापैकी तिघे नदीवर आंघोळ करण्यासाठी गेले आणि उर्वरित तिघे जवळच असलेल्या एका ढाब्यावर थांबून काही वेळाने नदीकडे गेले. राहुल, अंकुश आणि प्रवीण तिघेही नदीत आंघोळ करण्यासाठी उतरले असताना आणखी खोल पाण्यात गेल्याने बुडू लागले.
तिघांनी बचावासाठी आरडाओरड केली मात्र कोणीच समोर येईना. दरम्यान हे तिघे मित्र नदीजवळ पोहचले. त्या तिघांनी वाचविण्यासाठी बरेचट प्रयत्न केले. शेजारच्या गावातील लोकांना बोलावून आणले. मात्र तिघेही इतके खोल पाण्यात गेले होते तिथे कुणाचीही उतरण्याची हिंमत झाली नाही.
कामठी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. गावातील काही युवकांनी नदीत शोध घेतला असता गुरुवारी रात्री राहुलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला मात्र रात्रीच्यावेळी अंधार असल्याने काही दिसत नसल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या, सकाळी पोलिसांनी गोडेघाट नदीत शोध घेतला असता अंकुश आणि प्रवीण या दोघांचे मृतदेह मिळाले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठी रुग्णालयात पाठविण्यात आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.