आयकर समस्यांचा व्यापाऱ्यांपुढे डोंगर Print

स्पॅन्कोने टीडीएस जमा केला नाही
नागपूर / प्रतिनिधी
महावितरणची फ्रेंचाईझी कंपनी असलेल्या स्पॅन्कोने व्यापाऱ्यांकडून टीडीएस वसूल केला असताना कंपनीने मात्र सरकारी तिजोरीत टीडीएसचा पैसा जमा केला नसल्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उद्योजक बी.सी भरतिया यांनी दिली.
महावितरणने स्पॅन्को कंपनीला नागपुरातील महाल, सिव्हील लाईन आणि गांधीबाग या तीन विभागाची फ्रेंचाईझी दिली. आता या कंपनीचे कंत्राट एस्सेल युटीलिटी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या कंपनीने व्यापारांकडून टीडीएस वसूल केला मात्र कंपनीने सरकारच्या तिजोरीत पैसा जमा केला नसल्यामुळे व्यापारांना आयकर रिटर्न फाईलची समस्या निर्माण झाली आहे.
या कंपनीकडे महावितरणचे दीडशे कोटी रुपये थकित आहेत. कंपनीने ग्रामीण भागातील विद्युत सुविधा संदर्भात मोठय़ा प्रमाणात साहित्याची खरेदी केली आहे.
अशातच स्पॅन्को कंपनीने १४ ऑगस्ट २०१२ ला एस्सेल कंपनीकडे ह कंत्राट हस्तांतरित केले त्यामुळे व्यापारांच्या टीडीएसच्या गुंता कायम राहणार असल्याची भीती भरतिया यांनी व्यक्त केली.
स्पॅन्को कंपनीतील तीन संचालकांचा समावेश एस्सेल कंपनीत सहसंचालक म्हणून करण्यात आला आहे. म्हणजे केवळ कंपनीचे नाव बदलून नवो दोन संचालक समाविष्ट करून वीज वितरणाचा कारभार नवी एस्सेल कंपनी चालविणार आहे. गेल्या काही वर्षांत सरकारने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी), जॉईंट व्हेंचर अथवा फ्रेचाईसी मॉडेलच्या नावाने बाहेरील कंपन्यांना फायदा पोहचविण्याचा सपाटा सुरू केला आहे. यात शोषण मात्र व्यापारी आणि सामान्य जनतेचे होत आहे. शहरातील व्यापारांकडून कंपनीने मोठय़ा प्रमाणात मालाची उधारीने उचल केली. महावितरण कंपनीकडून वीज घेतली. व्यापाऱ्यांना देखील कोटय़वधी रुपये कंपनीकडून घेणे आहे. त्यामुळे हा व्यापारांचा पैसा कोण देणार? अशा प्रश्न भरतिया यांनी केला. या प्रकरणी सरकार स्पॅन्कोच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार काय असा सवाल पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी मथुराप्रसाद गोयल, शंकरलाल जालान, लक्ष्मीनारायण शर्मा, निखिलेश ठाकर, प्रभाकर देशमुख, रवींद्र गुप्ता, किशोर धाराशिवकर, सतीश बंग, ज्ञानेश्वर रक्षक आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.