संघावरील आरोपांनी अस्वस्थ स्वयंसेवक पलटवार करणार Print

माणिकरावांना लवकरच झणझणीत प्रत्युत्तर?
नागपूर / प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नितीन गडकरी यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आरोप केल्याने त्यामागचा ‘बोलविता धनी’ कोण आणि माणिकरावांना अचानक संघ विरोधाची उपरती का झाली याचा शोध सुरू झाला आहे. विदर्भाचे असलेल्या माणिकरावांनी आतापर्यंत गडकरींविरोधात तोंड उघडलेले नव्हते. यवतमाळात गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना अचानक त्यांनी संघाला मिळणाऱ्या निधीच्या स्रोताची चौकशी करण्याची मागणी केली. माणिकरावांचे प्रदेशाध्यक्षपद आता धोक्यात असून त्यांच्या जागी अशोक चव्हाण यांची वर्णी लागणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. ‘निष्क्रिय’  माणिकरावांची गच्छंती अटळ असल्याने त्यांनी पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर शरसंधान केल्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे. मात्र, माणिकरावांनी संघाला डिवचल्याने त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी संघाच्या दुसऱ्या फळीतील स्वयंसेवकांनी पूर्ण तयारी केल्याचे संघाच्या अंतस्थ सूत्रांकडून समजते.
काँग्रेस नेत्यांच्या भडिमाराला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली असून त्या संदर्भात लवकरच काही निवडक तरुण स्वयंसेवकांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, तरुण स्वयंसेवकांनी आक्रमक न होता शांत राहावे असा सल्ला काही ज्येष्ठ प्रचारकांनी दिला असल्याची माहिती मिळाली. नितीन गडकरी आणि संघ यांचे संबंध बघता प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केले. रेशीमबागमध्ये स्मृतीभवन परिसरात बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीसाठी आणलेल्या निधीची चौकशीची मागणी केली. संघ ही धार्मिक संघटना असून राजकारणात उतरली असल्यामुळे संघाची चौकशी करण्याची मागणी ठाकरे यांनी केल्यावर संघाचे तरुण स्वयंसेवक अस्वस्थ झाले असून त्यांनी आता ‘चूप बसणार नाही’, असा पवित्रा घेतल्याचे समजते.
प्रत्युत्तराची रणनिती ठरविण्यासाठी काही निवडक तरुण स्वयंसेवकांची नुकतीच एक गोपनीय बैठक नागपुरात झाली असल्याची माहिती मिळाली. गडकरी यांच्यावरील आरोपांचे संघाच्या विजयादशमी सोहळ्यात पडसाद उमटले होते. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांमध्ये याचीच चर्चा होती. काँग्रेसला  उत्तर देण्याची वेळ आल्याचे अनेक स्वयंसेवकांनी बोलून दाखविले. राष्ट्रासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच काँग्रेसकडून आरोप केले जात असल्यामुळे संघ स्वयंसेवक आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत.
प्रभात आणि सायं शाखेत स्वयंसेवकांमध्ये काँग्रेसच्या विरोधात उघडपणे चर्चा सुरू झाली आहे. काही ज्येष्ठ प्रचारकांनी तरुणतुर्काना तूर्त संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. कुठल्याही स्वयंसेवकांनी आक्रमक न होता शांत राहावे. वेळ आल्यास विरोधकांना उत्तर देऊ मात्र तूर्तास कोणीही त्याबाबत बोलू नये किंवा कुणाला प्रतिक्रिया देऊ नये, असे संदेश प्रभात शाखांमध्ये दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. कधीकाळी गडकरींबरोबर काम केलेलेअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तळागाळातील कार्यकर्तेही गडकरी विरोधकांची तोंड बंद करण्यासाठी आक्रमक मूडमध्ये असल्याचे चित्र आहे.