रब्बीच्या तोंडावर खताच्या किमतीत वाढ Print

शेतकऱ्यांचा कल हरभरा पिकाकडे
 नागपूर / प्रतिनिधी
धानाचा पट्टा वगळता इतर जिल्ह्य़ांतील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी सुरू केली आहे. या हंगामाच्या तोंडावरच रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने बळीराजाला आर्थिक झळ बसली आहे. या हंगामात हरभरा पिकांकडेच शेतक ऱ्यांचा कल अधिक आहे.
 नागपूर विभागात रब्बी पिकांचे क्षेत्र ४ लाख हेक्टर आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या दमदार पावसाने जमिनीतील ओलावा कायम आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग ही पिके काढून रब्बी पिकांसाठी जमीन तयार केली. या आठवडय़ात शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात केली. सध्या बाजारात हरभरा बियाणांची मागणी वाढली आहे. महाबीजच्या दहा किलो हरभरा बियाणांच्या बॅगची किंमत ७१० रुपये आहे. अंकुर कंपनीच्या हरभरा बियाणांच्या बॅगची किंमत ८५० ते ८९० रुपये आहे. महाबीजचा गहू लोकवन बियाणांचा दर ८०० रुपये (४० किलो) तर अंकुर लोकवन बियाणांचा दर ११६० आणि २१८९ वानाच्या बियाणांचा दर १३२० रुपये आहे. सूर्यफूल बियाणाची दोन किलोच्या बॅगची किंमत हजार रुपये आहे. हे बियाणे अजून बाजारात आलेले नाही. गहू आणि सूर्यफूलाच्या पेरणीला अजून वेळ असल्याने या बियाणांना अजून मागणी नाही. शेतातील ओलावा आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेता शेतकऱ्यांचा कल हरभरा पिकाकडे अधिक आहे.
रब्बी हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत. डीएपी खताला शेतकऱ्यांकडून अधिक मागणी आहे. आरसीएफकडून तयार करण्यात येत असलेल्या या खताची किंमत सरकारने १२६० रुपयावरून १३८६ रुपये प्रतिबॅग केली आहे. प्रत्येक बॅगवर १२६ रुपये वाढल्याने शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. खरीप हंगामात २५० रुपयांना मिळणाऱ्या युरियाच्या  ५० किलोच्या एका बॅगची किंमत आता २८० रुपये झाली आहे. मिश्र खतांमध्ये १५:१५:१५ खताची किंमत ८३० रुपये  प्रतिबॅग, २०:२०:०० ची किंमत ८६० रुपये आहे. सुपर फॉस्फेटच्या दरातही वाढ झाली आहे. खरीप हंगामात जुलैमध्ये ३३० रुपयांना मिळत असलेल्या बॅगची किंमत आता ४०० रुपये झाली आहे. हरभरा व गव्हाचे पुरेसे बियाणे बाजारात उपलब्ध आहे.
मात्र पश्चिम विदर्भात काही वर्षांपूर्वी रब्बी हंगामात मोठय़ा प्रमाणात पेरणी होणारे करडईचे बियाणे आता बाजारात उपलब्ध नाही, असे नागपूर बीज भांडाराचे विजय नेने यांनी सांगितले. खरिपातील सोयाबीन आणि भुईमुंग या पिकांची काढणी आता पूर्ण होत आली असून या शेतातही रब्बीची पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे.