अमरावती-नरखेड विभाग रेल्वे वाहतुकीसाठी खुला Print

रविवारपासून इंदूर-यशवंतपूर आठवडी स्पेशल
नागपूर /खास प्रतिनिधी
नव्याने बांधण्यात आलेला अमरावती-नरखेड विभाग रेल्वे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून २८ ऑक्टोबर ते २४ डिसेंबरदरम्यान इंदूर आणि यशवंतपूर व्हाया अमरावती-नरखेड ही विशेष रेल्वेगाडी आठवडय़ातून एकदा धावणार आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन इंदूर-यशवंतपूर दरम्यान व्हाया अमरावती-नरखेड अशी आठवडी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. ही रेल्वेगाडी नव्याने बांधण्यात आलेल्या नरखेड-अमरावती विभागातून धावेल. ०९३०७ इंदूर-यशवंतपूर आठवडी स्पेशल रेल्वे रात्री ८.५५ वाजता दर रविवारी (येत्या रविवार २८ ऑक्टोबरपासून) इंदूरवरून सुटणार असून (नऊ फेऱ्या) ती तिसऱ्या दिवशी (मंगळवारी) सकाळी ११.१५ वाजता यशवंतपूरला पोहोचेल. ही रेल्वेगाडी दर सोमवारी बैतुलवरून सकाळी ५.३० वाजता सुटेल, नरखेडला सकाळी ७.२५ वाजता, चांदूरबाजारला सकाळी ९.३० वाजता आणि अमरावतीला सकाळी १०.१० वाजता पोहोचेल. येत्या सोमवारपासून ही सुविधा उपलब्ध होईल.
०९३०८ यशवंतपूर-इंदूर आठवडी स्पेशल यशवंतपूरवरून दुपारी १.२० वाजता दर मंगळवारी (३० ऑक्टोबर ते २५ डिसेंबरदरम्यान ९ फेऱ्या) सुटेल आणि इंदूरला पहाटे ५.०५ वाजता तिसऱ्या दिवशी (गुरुवारी) पोहोचेल. ही रेल्वे अमरावतीहून दुपारी ३.२५, चांदूरबाजारहून दुपारी ४.०५, नरखेडहून ५.४० आणि बैतुल रात्री ७.२२ अशी फेरी करेल. येत्या बुधवारी, ३१ ऑक्टोबरपासून ते २६ डिसेंबपर्यंत ही रेल्वे धावणार आहे. आठवडी स्पेशल गाडय़ा देवास, उज्जन, मकासी, बेरच्छा, शुजालपूर, भोपाळ, हबीबगंज, इटारसी, बैतुल, नरखेड, चांदूरबाजार, अमरावती, अकोला, हिंगोली, दख्खन, पूर्णा, एच. साहिब नांदेड, मुदखेड, निझामाबाद, कामरेड्डी, मलकानगिरी, काचेगुडा, मेहबूबनगर, गढवाल, कर्नुल टाऊन, गुटी, धरमवरम आणि येलहंका या रेल्वेस्थानकावर थांबणार असल्याचे मध्य रेल्वेने एका पत्रकातून कळविले आहे.
आठवडी स्पेशल रेल्वेगाडीला १४ डबे (एक एसी-२ टायर, चार एसी ३ टायर, सात स्लीपर क्लास आणि दोन सर्वसाधारण द्वितीय श्रेणी-गार्ड ब्रेक व्हॅनसह) राहणार आहेत.