दीक्षाभूमी सोहोळ्याकडे काँग्रेस नेत्यांची पाठ Print

गडकरींवरील बहिष्काराची रणनीती
 नागपूर / प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या मुख्य सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना आमंत्रित केल्यामुळे काँग्रेसचे अनेक मंत्री आणि स्थानिक नेत्यांनी नागपुरात असतानाही मुख्य कार्यक्रमाकडे पाठ फिरविली.
काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी गडकरी यांच्या चौकशीची मागणी केली असल्याने ज्या कार्यक्रमांना गडकरी उपस्थित असतील, अशा कार्यक्रमात काँग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावू नये, असे जारी झाल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. नागपुरात दसऱ्याच्या दिवशी ऐतिहासिक असा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा असताना गेल्या अनेक वर्षांंची परंपरा बघता काँग्रेस नेत्यांना ही पर्वणी असते. यंदाचे चित्र मात्र वेगळेच दिसले.
दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे दरवर्षी केंद्रातील मंत्र्यासहीत राज्याचे मुख्यमंत्री आणि इतरही विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांना सोहळ्यासाठी आमंत्रित केले जाते. यावर्षी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक, राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत, अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पालकमंत्री शिवाजीराव मोघे, खासदार विलास मुत्तेमवार, खासदार दत्ता मेघे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचा राजशिष्टाचार पाळण्यासाठी नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे आणि स्मारक समितीचे अध्यक्ष रा.सू. गवई या दोन्ही नेत्यांना उपस्थित राहणे अनिवार्य असल्यामुळे ते व्यासपीठावर होते मात्र, काँग्रेसच्या जवळजवळ सर्वच नेत्यांनी मुख्य कार्यक्रमाकडे पाठ फिरविली.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हजारो लोकांसाठी अन्नदानाची सोय करणारे रोहयो मंत्री नितीन राऊत दसऱ्याला दीक्षाभूमी परिसरात असताना व्यासपीठाके फिरकलेदेखील नाहीत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक, अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक,  खासदार विलास मुत्तेमवार, दत्ता मेघे, आमदार दीनानाथ पडोळे, शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी यांनी कार्यक्रमाला दांडी मारली.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मिळाल्याने खासदार विलास मुत्तेमवार आणि मुकुल वासनिक दिल्लीत असल्याचे सांगण्यात आले. दरवर्षी मुख्य सोहळ्यास उपस्थित राहणारे काँग्रेसचे नेते यावेळी मुख्य कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याची चर्चा आता दलित समाजामध्ये जोर धरू लागली आहे.