राहुल देशपांडे यांचे दर्जेदार गायन Print

डॉ. सुलभा पंडित

शास्त्रीय संगीताच्या बैठकी आजकाल कमीच झाल्या आहेत. त्यामुळे जेव्हा त्या होतात तेव्हा त्यांची दखल घेणे गरजेचे ठरते. अनौपचारिक खाजगी मैफिली हाही आज कमी होत जाणारा प्रकार आहे. त्यामुळे त्या जेव्हा होतात आणि त्या ठिकाणी जाण्याची संधी जेव्हा मिळते तेव्हा पट्टीचा रसिक ती संधी कधीच सोडत नाही, कारण अशा बैठकींचा आनंद काही औरच असतो. कलाकार परिचयाचा असेल तर होणारा सुसंवाद खरोखर हवाहवासा वाटणारा असतो. अशी एक मैफील नुकतीच संपन्न झाली. दिवं. नानासाहेब शेवाळकर यांच्या निवासस्थानी नवरात्रीच्या निमित्ताने हे गायन झाले. नानासाहेब असताना अशा बैठकींचे आयोजन होत असे. अशा अनेक मैफिली आज आठवतात. तीच परंपरा त्यांचे कुटुंबीय- म्हणजे विजयाबाई, आशुतोष आणि मनीषा यांनी आवर्जून सुरू ठेवली आहे. यावर्षीचे मानकरी होते आजचे आघाडीचे गायक राहुल देशपांडे.
राहुल देशपांडे आजच्या युवा कलाकारांपैकी एक ठळक नाव. अलीकडेच ‘संगीत कटय़ार काळजात घुसली’ आणि ‘संगीत सौभद्र’ या नाटकांसाठी ते येऊन गेले. त्यामुळे नागपूरकर संगीतप्रेमींसाठी ही आणखी एक सुसंधी चालून आली. वैदर्भीय रसिकांचे लाडके गायक वसंतराव देशपांडे यांचे ते नातू असून त्यांना बाल कलाकार असल्यापासून नागपूरच्या रसिकांनी ऐकले आहे. वसंतरावांच्या आठवणींनी डोळे पाणावणारे अनेक संगीतप्रेमी आजही येथे आहेत. शेवाळकर कुटुंबीय त्यापैकीच एक. याप्रसंगी राहुलशी बोलताना विजयाबाईंना वसंतरावांच्या आठवणींनी गहिवरून आले. बाबा आमटे यांच्यासमवेतच्या, बुवांच्या, पुलंच्या अनेक आठवणी त्यांनी याप्रसंगी नमूद केल्या. त्यावेळी ऐकलेले बुवांचे गाणे आजही त्यांच्या स्मरणात आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर राहुल देशपांडे यांचे गायन रसिकांनी कौतुकाने ऐकले असल्यास नवल नाही. त्यांच्या गायनात आजोबांच्या शैलीची आठवण येते, हे खरेच आहे. त्याबरोबरच कुमार गंधर्वाच्या गायनाचाही बराचसा प्रभाव त्यांच्या गायनावर जाणवतो.
आपल्या गायनाचा प्रारंभ त्यांनी राग ‘मारू-बिहाग’ने केला. या आपल्या गायनाचा प्रारंभ बडा ख्याल ‘उनहीसे जाए कहो’ विलंबित एक तालात, तर द्रुत बंदिश ‘मै पतिया लिख भेजी’ तीन तालात त्यांनी सादर केली. त्यांच्या ख्यालगायनाच्या बढतीमध्ये तालमीची शिस्त जाणवते. बोलअंग, माफक सरगम, आकाराच्या दमदार ताना यांनी हा ख्याल सिद्ध झाला. खुले मोकळे स्वर लगाव, दाणेदार तनाईत त्यांच्या ख्याल गायनाची वैशिष्टय़े आहेत. त्यानंतर त्यांनी रसिकांच्या आग्रहास्तव कुमारजींचा राग ‘धन बसंती’ निवडला. पुरिया धनश्री आणि बसंत या दोन रागांचा मेळ या जोडरागात घातलेला आहे. कुमारजींची ही नवनिर्मिती या निमित्ताने ऐकायला मिळाली.
‘दीपकी ज्योत जले’ ही मध्यलयातील तीनतालातील बंदिश त्यांनी आटोपशीरपणे ऐकविली. त्यानंतर अर्थातच ते नाटय़संगीताकडे वळले. संगीत कटय़ारमधील ‘घेई छंद मकरंद’ हे नाटय़पद त्यांनी ढंगदारपणे प्रस्तुत केले. त्यानंतर ‘राधाधर मधुमिलिंद’ हे ‘संगीत सौभद्र’ मधील हातखंडा पद सादर करीत असता नाटय़संगीत या गान प्रकारावरील पकड त्यांनी सिद्ध केली. ‘बगळ्यांची माळ फुले’ या भावगीतालाही त्यांनी उचित न्याय दिला. कुमारगंधर्वाची मोहर उमटलेली निर्गुणी भजने हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. ‘कौन ठगला नगरिया’ आणि ‘शून्य घर शहर’ ही अनुक्रमे कबीर आणि गोरखनाथांनी रचलेली पदे सादर करीत असता त्यातील भावपक्षालाही त्यांनी पुरेसा न्याय दिला. एकूण काय तर, त्यांचे गायन अतिशय रंगतदार झाले.
राहुल देशपांडे यांच्या ख्याल गायनात वजन आहे. सूर-तालाचा मझा आहे. नाटय़संगीत, भावगीत, भजन या सुगम संगीताच्या प्रकारांवरही त्यांची हुकुमत आहे.
आपल्या या चतुरस्र गायनाने त्यांनी रसिकांना खूष केले. त्यांना उचित साथसंगत करणारे युवा, तडफदार कलावंत होते तबल्यासाठी निखिल फाटक, तरसंवादिनीसाठी राजीव परांजपे यांची साथसंगत अतिशय तयारीने व समजदारीने झाली, हे मुद्दाम सांगायला पाहिजे. या तीनही कलावंतांचा आपापसातील संवाद उत्तम होता. त्यामुळेच कार्यक्रम अतिशय रंगला, हे सांगायची वेगळी गरज नाही.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश एदलाबादकर यांनी केले, तर कलावंतांचे स्वागत आशुतोष शेवाळकर यांनी केले. अशा अनौपचारिक बैठकी झाल्या पाहिजेत. त्यामुळे कलावंत-रसिक संवाद छान घडत असतो.