केशुभाई पटेल लवकरच सरसंघचालकांच्या भेटीला Print

नागपूर/ खास प्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ त्यांचे कट्टर विरोधक केशुभाई पटेल लवकरच नागपूरच्या संघ मुख्यालयात येणार असून, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा करणार आहेत. केशुभाईंच्या आगमनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु, येत्या आठवडाभरात केव्हाही त्यांचा नागपूर दौरा ठरू शकतो, असे संकेत संघ मुख्यालयातील सूत्रांनी दिले आहेत. या भेटीगाठीसाठी मोदी विरोधक संजय जोशी यांनी पुढाकार घेतला असल्याचे सांगण्यात आले.
गुजरातमध्ये एकेकाळी अधिराज्य करणारे केशुभाई पटेल भाजपातून बाहेर पडले असून, त्यांनी गुजरात परिवर्तन नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. त्यांनी तीन दिवसांपूर्वी अहमदाबादेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राज्य मुख्यालयात जाऊन ज्येष्ठ प्रचारक भास्करराव दामले यांची भेट घेतली.
भास्करराव दामले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे संघाने प्रचारकपदावरून निवृत्ती दिली आहे. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ८३ वर्षीय केशुभाई आले होते. केशुभाई मूळ संघ स्वयंसेवक असल्याने त्यांची संघ आणि विहिंपशी जवळीक संपलेली नाही. गडकरींच्या पक्षाध्यक्षपदाच्या कार्यकाळातच केशुभाईंनी भाजपचा त्याग केला आहे. केशुभाईंचा गुजरातेतील प्रभाव लक्षात घेता त्यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता लक्षात घेता केशुभाईंशी दिलजमाईच्या हालचाली सुरू झाल्या असून पहिला प्रयत्न नागपुरात केला जाणार आहे.
अहमदाबादेत पत्रकारांशी बोलताना केशुभाईंनी नागपुरात जाऊन सरसंघचालकांना भेटणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या पाश्र्वभूमीवर मोदी समर्थक अस्वस्थ झाले असून केशुभाईंना संघाचा पाठिंबा मिळू नये, यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. गुजरात परिवर्तन पक्षाला निवडणुकीत मोठे यश मिळणे मोदींच्या दृष्टीने डोकेदुखी ठरणार आहे. कारण, केशुभाईंच्या प्रभावाने भाजपच्या जागा कमी होण्याची अटकळ बांधली जात आहे.
अशा परिस्थितीत दोन्ही कट्टर विरोधकांना एकत्र आणण्याची कसरत सरसंघचालकांना करावी लागणार आहे. हिंदू हिताच्या मुद्दय़ावर यावेळी नरेंद्र मोदींनी अतिशय मवाळ भूमिका घेतल्याची तक्रार केशुभाईंनी संघाकडे केल्याचे समजते.