स्तनाच्या कर्करोगाचे सर्वाधिक मृत्यू भारतात Print

नागपूर / प्रतिनिधी
स्तनाच्या कर्करोगाने देशभरात १२ टक्के महिलांचे मृत्यू होत असून एकूण ४ लाख ५८ हजार ६५२ मृत्युंमध्ये अमेरिका आणि रशियानंतर जगात भारत आणि चीनचा क्रमांक लागतो, असे धक्कादायक संशोधन राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमाच्या आकडेवारीत प्रसिद्ध झाले आहे. स्तनाच्या कर्करोगाबद्दल देशात भीतीचे वातावरण निर्माण भारतात स्तनाचा कर्करोग ४० ते ५० वयोगटातील महिलांना अधिक प्रमाणात होतो तर पाश्चात्य देशात ६० ते ७० वर्षांच्या महिलांना होतो, असे आढळून आले आहे. महिला स्तन जागरुकता परिषदेच्या निमित्ताने हे संशोधन मांडण्यात आले आहे.
भारतात हा आजार अत्यंत सामान्य झाला आहे. भारतातील सर्वच शहरांमध्ये महिलांना स्तनाच्या कर्करोगासोबर गर्भाशयाच्या विकारानेही पछाडले आहे. २००८ मधील आकडेवारीनुसार प्रती लाख २२.९ वयोगटातील मानकीकृत दरानुसार १ लाख १५ हजार २५१ नवीन प्रकरणे पुढे आली होती. सरासरी अंदाजानुसार २०३० पर्यंत भारतातील स्तनाचा कर्करोग जडलेल्या महिलांची आकडेवारी दरवर्षी सरासरी २ लाखांपर्यंत पोहोचेल, असा इशारा देण्यात आला आहे.
आरएसटी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलचे मेडिकल ऑर्नस्टॉलॉजिस्ट डॉ. प्रणय टावरी यांनी दिलेल्या माहितीनुसार रोगाबद्दल जागरूकतेचा अभाव आणि चुकीचे उपचार यामुळे ७५ टक्के रुग्ण आजाराच्या विकसित अवस्थेपर्यंत पोहोचते. शहरीकरण, विकासासोबत जीवनशैलीमध्ये झालेला बदल स्तनाचा कर्करोग वाढविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. लठ्ठपणा, उशिरा लग्न, उशिरा अपत्य होणे, दारूचे अतिसेवन, गर्भनिरोधक गोळ्यांचे प्रमाण हेही धोकादायक आहे. या आजारबद्दल माहिती पडल्यास विद्यमान चिकित्सा पद्धतीमुळे ९० टक्के रुग्ण आपले उर्वरित आयुष्य जगू शकतो, असेही डॉ. प्रणय टावरी म्हणाले. चाळीशी उलटलेल्या महिलांनी वर्षांतून एकदा मॅमोग्राफी करावी, असाही सल्ला त्यांनी दिला.
कर्करोगाची अवस्था, टय़ूमरचे प्रकार यावर उपचाराचे मापदंड अवलंबून आहेत. उपचार सुरू केल्यास ९० टक्के कर्करोगींचे प्राण वाचविता येऊ शकते.  
कोणताही संकोच न बाळगता स्तनाचे परीक्षण करून घेणे, असामान्यता आढळल्यास चिकित्सकांचा सल्ला घेणे, चाळीशी उलटलेल्या महिलांनी मॅमोग्राफी करणे अनिवार्य असल्याचे डॉ. प्रणय टावरी यांनी सांगितले.