गोसीखुर्द धरणावर डोंगा मोर्चाची धडक Print

नागपूर / प्रतिनिधी
alt

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना जगण्याचे साधन मिळावे, लाभ क्षेत्रातील जागा मिळावी या मागण्यांसह विविध प्रकल्पग्रस्ताच्या समस्यांसंदर्भात गोसीखुर्द धरणावर डोंगा मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले.गोसीखुर्द धरणाच्या बुडीत क्षेत्रातील आजूबाजूच्या गावातील प्रकल्पग्रस्त वैनगंगा नदीत संघटित झाल्यावर त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. ‘वैनगंगा करे पुकार, जीने का हक, या मौत का जाल’, ‘अब हमारी बारी है, लढने की तैयारी है’ प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन झाले पाहिजे, मासेमारीचा हक्क मिळाला पाहिजे अशा घोषणा दिल्या जात असताना सरकारचा निषेध केला जात होता. धरणावर असलेल्या डोंग्या आणि जमा झालेल्या लोकांना पाहून आंदोलकांना गहिवरून आले. वैनगंगानदीने आपल्यासाठी केलेला सांभाळ व काही दिवसांनी वंदीच्या पात्रातून प्रकल्पग्रस्त म्हणून होणारी हकालपट्टी होण्याच्या कल्पनेने अनेक प्रकल्पग्रस्त भावूक झाले.
गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना सरकारी नोकरी मिळावी, मासेमारीचा अधिकार मिळावा, पुनर्वसनाचे आर्थिक पॅकेज घोषित करावे, सामाजिक सुरक्षा मिळावी, नव्या गावठाण्यात सुयोग्य नागरी सुविधा देऊन पुनर्वसन करावे, इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
समितीचे प्रमुख आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात विठोबा समरीत, काशिनाथ सहारे, दादा आगरे, माणिक गेडाम, गुणाराम चुधरी, निळकंठ देशमुख, समीक्षा गणवीर, शारदा गाढवे उपस्थित होते. या आंदोलनात पाथरी, मेंढा, नवेगाव, सिर्सी, मालची, पेंढरी, सौंदड, सिरसघाट, जीवनापूर, गाडेघाट, आंभोरा, अर्जुनी मिगाव, जामगाव, चिचखेडा आदी गावातील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. कार्यकारी अभियंता वर्धने आणि तहसीलदार चामट यांनी प्रकल्पग्रस्तांचे निवेदन स्वीकारले. निवेदन शासनाकडे पाठविण्यात आल्यानंतर शासनाच्या आदेशानंतर बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना देण्यात आले.