भाजपच्या प्रचाराची संघाकडून पूर्वतयारी Print

राममंदिर उभारणीच्या मुद्दा पुन्हा ऐरणीवर येणार
नागपूर/ खास प्रतिनिधी
alt

राममंदिर उभारणीच्या मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा एकवार ऐरणीवर आणला असून २०१४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारात याचा खुबीने वापर केला जाणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. रा.स्व. संघाच्या नागपुरातील रेशीमबाग मैदानावर झालेल्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राममंदिराचा राग आळवल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. अमरावती येथील संत संमेलनात बोलताना सरसंघचालकांनी राम मंदिरावर भर देऊन संघांच्या अजेंडय़ावर हा मुद्दा सर्वोच्च स्थानी असल्याचे जणू स्पष्ट केले. भाजपच्या प्रचाराच्या पूर्वतयारीची ही झलक समजली जात आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकांना काही दिवस शिल्लक असून प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. दोन्ही राज्यातील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. उत्तराखंडमध्ये एका जागेपायी भाजपला सत्तेपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. या पाश्र्वभूमीवर हिमाचल आणि गुजरात हातचे जाऊ नये, यासाठी भाजपचे नेते प्रयत्नशील आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाही राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी हिमाचलात झंझावती प्रचारदौरे केले मात्र, राम मंदिराबद्दल भाजपच्या एकाही वरिष्ठ नेत्याने प्रचारसभांमधून चकार शब्दही काढलेला नाही. उलट, हिंदू मतांसाठी संघाचे वरिष्ठ नेते राम मंदिर उभारणीचा आग्रह करून भाजपला अप्रत्यक्ष बळ देत आहेत.
सरसंघचालकांची अलीकडील राममंदिर समर्थनाची विधाने भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य अजेंडय़ाची रंगीत तालीम समजली जात आहे. यात प्रत्यक्षपणे राम मंदिर समाविष्ट केले जाणार नसले तरी संघाचे नेते राम मंदिरावर विधानांद्वारे हिंदूंमध्ये जागृती करण्याचे प्रयत्न सुरू ठेवतील, अशी रणनिती ठरल्याचे समजते. भाजपच्या सूत्रांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विजयादशमीच्या निमित्ताने याची झलक पाहण्यास मिळाली आहे. नितीन गडकरींच्या दुसऱ्या टर्ममध्ये यात अधिक आक्रमकता आणली जाण्याची शक्यता आहे.