डोरले हल्लाप्रकरणातील आरोपीच्या घरी अठरा लाखांची घरफोडी Print

नागपूर / खास प्रतिनिधी
घराच्या दाराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी  सुमारे अठरा लाखाचा ऐवज चोरून नेला. बारानल चौकातील शाहू मोहल्ल्यात रविवारी रात्रभरात ही चोरी झाली.माजी महापौर किशोर डोरले यांच्यावर शनिवारी सकाळी प्राणघातक हल्ला झाला. यातील आरोपी रज्जू शाहू याच्या घरी ही चोरी झाली. याप्रकरणी इंद्रपाल उर्फ रज्जु हिरालाल शाहू, राजेश इं्रद्रपाल शाहू, प्रमोद इंद्रपाल शाहू, पप्पू उर्फ महेश इंद्रपाल शाहू व बबलू उर्फ भूपेंद्र इंद्रपाल शाहू (सर्व रा. बारानल चौक, कोलबा स्वामीनगर) या आरोपींनी यशोधरानगर पोलिसांनी अटक केली. त्यामुळे इंद्रपाल यांच्या पत्नी व सुना रात्री नातेवाईकांकडे घराला कुलूप लावून गेल्या. आज सकाळी त्या घरी परत गेल्या असता घराच्या दाराचे कुलूप त्यांना तुटलेले दिसले.
पहिल्या मजल्यावरील दाराचे कुलूप तसेच आलमारी फोडलेली दिसली. आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व रोख ५० हजार, असा एकूण ७ लाख १७ हजार ९५० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. दरम्यान, या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असूनही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शाहू कुटुंबीयांचे इतवारीत लोखंडाचे दुकान असून तेथेही चोरीचा प्रयत्न झाल्याचे शाहू कुटुंबीयांचे म्हणणे होते.
चोरीची दुसरी घटना रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास घडली. एका प्रवासी महिलेच्या बॅगमधील सोन्याचे दागिने चोरटय़ांनी लांबवले. कुसुम भीमराव टेंभुर्णे (रा. श्रीराम कॉलनी, पिंपरी पुणे) या परसोडीत राहणाऱ्या दीराकडे काल सायंकाळी आल्या. सायंकाळी त्या स्टार बसने (एमएच/३१/सीए/५०७८) महाराजबागपासून जयताळाकडे जात होत्या. त्यांच्या बॅगची चेन उघडून त्यातील लहान पर्समधील नगदी पाच हजार व सोन्याचे मंगळसुत्र, असा एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. त्यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.