‘आरोप करणाऱ्यांविरुद्ध आता कायदेशीर लढाई’ Print

प्रसारमाध्यमे आणि काँग्रेसवर गडकरी बरसले
नागपूर/प्रतिनिधी

काही प्रसार माध्यमे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी कुठल्याही प्रकरणाची शहनिशा न करता आरोपांची राळ उडवून माझे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या बदनामीविरुद्ध कायदेशीर मार्गाने आणि जनतेला सोबत घेऊन लढाई लढणार असल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिला. हिमाचल प्रदेशचा निवडणुकीचा दौरा आटोपून नितीन गडकरी आज सकाळी नागपुरात परतल्यावर त्यांचे नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आल्यानंतर महालातील वाडय़ासमोर जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांसमोर गडकरी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी यांच्यावर काही प्रसार माध्यमांकडून पूर्ती उद्योग समूहातील गुंतवणुकीवरून वेगवेगळे आरोप केले जात आहेत. आरोपांचा समाचार घेताना गडकरी म्हणाले, आरोप करणाऱ्या प्रसार माध्यमांविरुद्ध आता कायदेशीर लढाईच लढणार आहे. एका मीडिया कंपनीने १० रुपयांचे शेअर्स ३८ हजार रुपयांना घेतले असून मॉरिशसमध्ये काळ्याचा पांढरा पैसा केला आहे. यासंदर्भातील पुरावे माझ्याजवळ असून वेळ आल्यास त्याचा परामर्श घेणार आहे. प्रसार माध्यमांनी माझ्यावर आरोप करताना कुठल्याही प्रकरणाची शहनिशा केली नाही. त्यामुळे या विरोधात कायदेशीर लढाई लढण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ व्ही.आर. मनोहर यांची मदत घेणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी माझ्याविरुद्ध आणि पूर्ती उद्योग समूहाविरुद्ध आरोप केले असून त्याचाच फायदा घेत काही काँग्रेस नेत्यांच्या सांगण्यावरून काही प्रसार माध्यमांनी माझे चारित्र्यहनन चालविले आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या घरासमोर उभ्या असलेल्या कारमध्ये एका बालिकेचा मृत्यू झाला होता. काँग्रेसने त्याचे राजकारण करून माझ्यावर आरोप लावले. यातून काहीच निष्पन्न झाले नाही. पूर्ती उद्योग समूहावर   जमिनी  हडपल्याचा आरोप केला जात आहे, आदर्श घोटाळ्यात माझे नाव जोडले जात आहे,  असे गडकरी उद्वेगाने म्हणाले.
माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्व द्वारे मी खुली करून दिली आहेत. सरकारने कोणत्याही माध्यमातून याची चौकशी करावी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेतला मात्र, शेतकऱ्यांचे देणे असलेले २३ लाख रुपये बुडविले, असा आरोप गडकरी यांनी केला.