‘रेनबो’ रुग्णालयाला आगीचा वेढा Print

सुदैवाने प्राणहानी नाही, पॅथॉलॉजी विभागाचा कोळसा
नागपूर / खास प्रतिनिधी
रामदासपेठमधील रेनबो रुग्णालयाला सोमवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीने तेथे धावपळ उडाली होती. रुग्णालयातील पॅथॉलाजी विभाग बेचिराख झाला. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र रुग्णालयाची मोठी आर्थिक हानी झाली आहे.
रेनबो रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावरील पॅथॉलॉजीतून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आग लागल्याचे मध्यरात्रीनंतर दिसले. त्यांनी आरडाओरड केली. आग लागल्याचे दिसताच रात्रपाळीत असलेले डॉक्टर, परिचारिका तसेच कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. रुग्णालयात काही रुग्ण दाखल असल्याने त्यांना कसे हलवायचे, असा प्रश्न त्यांना पडला. रुग्णालयाच्या संचालकांना तातडीने कळविण्यात आले. आग लागल्याचे समजताच संचालक तेथे पोहोचले. या परिसरातील इतर रुग्णालयातील कर्मचारी आग लागल्याचे समजताच मदतीला धावून आले. उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नातेवाईक या घटनेने हादरून गेले होते. त्यांच्या इतर नातेवाईकांनी तातडीने तेथे धाव घेतली.  
या दरम्यान अग्निशमन दलाच्या पाच गाडय़ा तेथे तातडीने पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी रुग्णालयात दाखल रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने स्ट्रेचर तसेच व्हिल चेअरद्वारे खाली आणले. तेथून रुग्णवाहिकांमधून तातडीने परिसरातील रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. आग फक्त पॅथॉलॉजीत लागली होती. पाहता पाहता आगीने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या गाडय़ा पोहोचताच काही जवानांनी आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. तासाभरात आगीवर ताबा मिळवला. मात्र, तोपर्यंत लाकडी फर्निचर, वायरिंग पूर्णपणे आगीच्या स्वाधीन झाले होते.
संगणक, दोन रेफ्रिजरेटर, वातानुकूलित यंत्रे, रक्त तसेच इतर परीक्षणासाठी उपयोगी यंत्रे, रक्ताचा साठा सर्वकाही आगीत जळून खाक झाले. आलमारीची लोखंडी पत्रे, यंत्रांची लोखंडी जाळी तेवढी शिल्लक राहिली.
सुदैवाने आगीत कुणीही जखमी झाले नाही. आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याचे समजताच सीताबर्डी पोलीसही तेथे पोहोचले.  रुग्णालयाला आग लागल्याची नागपुरातील ही दुसरी घटना आहे.
काही महिन्यांपूर्वी पंचशील चौकातील रुग्णालयाला आग लागली होती. त्यावेळी तेथेही धावपळ उडाली. उंच इमारत विशेषत: रुग्णालयात आकस्मिक घटनेनंतर बचाव कार्याचे रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.