कोण टिकेल, कोण सुटेल? Print

* राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पाश्र्वभूमीवर वैदर्भीय नेत्यांच्या हालचालींना वेग  * दिल्लीवाऱ्याही सुरू
* देवेंद्र गावंडे ,मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पाश्र्वभूमीवर आता विदर्भातील नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरू झाल्या आहेत. विद्यमान मंत्री लाल दिवा टिकावा म्हणून, तर इच्छुक नेते लाल दिवा मिळावा म्हणून पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्यात सध्या व्यस्त आहेत.
काल रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल आटोपल्यानंतर आता राज्यातील नेत्यांना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वेध लागले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी नागपुरात बोलताना हिवाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होईल, असे स्पष्ट केल्याने या प्रक्रियेशी संबंधित सर्व नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळी झाल्यानंतर १६ ते २० नोव्हेंबरच्या दरम्यान हा विस्तार अपेक्षित आहे. दिवाळीच्या काळात पक्षश्रेष्ठींना भेटणे योग्य ठरणार नाही, हे लक्षात आल्यामुळे नेत्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात कार्यक्षमतेच्या मुद्यावरून किमान तीन मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याच्या वृत्ताने विद्यमान मंत्री सुद्धा धास्तावले आहेत. आपला लाल दिवा तर जाणार नाही ना, या भीतीने या नेत्यांनी आता दिल्लीत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात विदर्भातील मंत्री व नेते आघाडीवर आहेत.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांना मुख्यमंत्र्यांच्या गोटातून दिलासा मिळाला असला तरी तेही आपल्या समर्थकांसह कालपासून दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. राजुराचे आमदार सुभाष धोटे, आरमोरीचे आनंदराव गेडाम, गडचिरोलीचे खासदार मारोतराव कोवासे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाष गौर ही नेते मंडळी देवतळेंसोबत दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेण्यात सध्या व्यस्त आहे. याशिवाय, नागपूरचे आमदार दीनानाथ पडोळे सुद्धा दिल्लीत तळ ठोकून आहेत. पडोळे हे खासदार विलास मुत्तेमवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मुत्तेमवार यांना स्थान मिळाले नाही. या पाश्र्वभूमीवर किमान राज्याच्या मंत्रिमंडळात तरी आपल्या समर्थकांची वर्णी लागावी, यासाठी आता मुत्तेमवार प्रयत्न करणार आहेत. पक्षाचा विचार केला तर नागपुरात सक्रीय असलेल्या नेत्यांमध्ये मुत्तेमवार विरोधकांचाच भरणा अधिक आहे. शिवाय, त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. या पाश्र्वभूमीवर किमान एक तरी समर्थक मंत्री हाताशी असावा, असा प्रयत्न मुत्तेमवारांचा राहणार आहे.   चंद्रपूर जिल्ह्य़ाच्या राजकारणात संजय देवतळे व नरेश पुगलिया यांचे स्वतंत्र गट आहेत. सध्या पुगलिया गटात असलेले चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार गेल्याच आठवडय़ात पुगलियांसोबत दिल्लीवारी करून आले. वडेट्टीवारांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर देवतळेंवर गदा येऊ नये, यासाठी त्यांचे समर्थक आता दिल्लीत दाखल झाले आहेत.
देवतळेंसोबत विदर्भातील खासदार सुद्धा आहेत, असा दावा त्यांच्या समर्थकांनी आता दिल्लीत करणे सुरू केले आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात नेमक्या कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळतो, याविषयीचे गूढ कायम असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विदर्भातील मंत्र्यांनी आता धावपळ सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात अखेरच्या क्षणी नेमका कुणाचा पत्ता कटेल आणि कुणाचा समावेश होईल, याबाबतची खात्री कुणीच देऊ शकत नाही. काँग्रेसची संस्कृती आजवर तशीच राहिलेली आहे. ही पाश्र्वभूमी ठाऊक असल्यामुळेच ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर हे नेते सक्रीय झाले आहेत.