भिवापूर मार्गावरील अपघातात चार ठार Print

नागपूर / खास प्रतिनिधी
वेगात आलेल्या वाहनाच्या धडकेने आई-वडील व दोन मुली ठार झाल्या. उमरेड ते भुयार या मार्गावर भिवापूरपासून तेरा किलोमीटर अंतरावरील मानोरा येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. मधुकर बळीराम गडेकर, लता मधुकर गडेकर, लतिका मधुकर गडेकर व सीमा मधुकर गडेकर ही मरण पावलेल्यांची नावे आहेत. मधुकर कंत्राटदार असून सध्या ते उमरेडमधील कावरापेठेत राहायचे. भंडारा जिल्ह्य़ातील भुयार हे त्यांचे मूळ गाव आहे. काल रात्री ते त्यांच्या दुचाकीने (एमएच/४०/पी/२९३६) भुयारला आई व भाच्याला भेटण्यासाठी जात होते. समोरून वेगात आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात ते जागीच ठार झाले. अपघातानंतर पळून गेलेल्या अनोळखी वाहन चालकविरुद्ध भिवापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर पलांदूरकर यांनी घटनास्थळी भेट दिली.